राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा काल (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर अन्य 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
यानंतर शरद पवार हे आज ( 3 जुलै ) कराड येथील माजी मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ असलेल्या प्रितीसंगम येथे अभिवादन केले आहे. त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित आहेत. यावेळी चव्हाण यांनी मोठी धक्कादायक माहिती दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या वाटाघाटी चालू होत्या. पण मागच्या वेळी मी बोललो होतो तेव्हा वाईट झाला होतो. भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याची आमची माहिती आहे. विधानसभा अध्यक्षांकडून एकनाथ शिंदेंचे 16 आमदार अपात्र झाल्यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री करणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. तसेच महाविकास आघाडी म्हणून आम्ही भाजपच्या जातिवादी प्रचाराच्या विरोधात लढत राहू, असे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले.
यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील काल माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार असल्याचे म्हटले होते. या शपथविधीचा अर्थ म्हणजे शिंदेंचे 16 आमदार अपात्र होणार असे राऊत म्हटले होते. त्यामुळेच भाजपला हा टेकू घ्यावा लागल्याची टोला त्यांना लगावला होता.
दरम्यान, यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत संघर्ष पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह 8 आमदारांना अपात्रतेची नोटीस दिली आहे. त्यामुळे आगामी काळात सत्तासंघर्ष आणखी तीव्र होणार असे बोलले जात आहे.