मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर कुणबी नोंदी आढळल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याची घोषणा केली. मात्र, मनोज जरांगे सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. अशातच राज्यात अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आज (१ नोव्हेंबर) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. याची माहिती देताना मंत्री शंभुराज देसाई यांनी एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बैठकीला बोलावल्याचं सांगितलं.
शंभुराज देसाई म्हणाले, “मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी एकनाथ शिंदेंनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शरद पवारांना बोलावलं आहे, उद्धव ठाकरेंना बोलावलं आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले अशा सर्व प्रमुख लोकांना बैठकीला बोलावलं आहे. आता महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र विचार विनिमय केला पाहिजे.”
“सरकारची अजिबात आडमुठी भूमिका नाही”
“एकत्र येऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी पुढाकार घेतला आहे. आज (१ नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजता ती बैठक होत आहे.त्या बैठकीत सर्वांशी चर्चा केली जाईल. सरकारची अजिबात आडमुठी भूमिका नाही. सरकार सर्वांचे विचार ऐकून घेईल. तसेच आज जे ठरले त्यासाठी सरकार सकारात्मकपणे पावलं उचलेल,” अशी माहिती शंभुराज देसाई यांनी दिली.