Thursday, September 28, 2023
Homeताजी बातमी'केंद्र सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना ईडीची नोटीस- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

‘केंद्र सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना ईडीची नोटीस- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

२९ डिसेंबर २०२०,
‘केंद्र सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) नोटीस देण्यात येते, हे आता जनतेला समजले आहे. जाणीवपूर्वक त्रास देण्याचा आणि विरोधात बोलणाऱ्यांना बदनाम करण्याचे हे धोरण असून, त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही,’ असे सांगून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राज्यातील सरकार पाडण्यासाठी ‘ईडी’कडून दबाव आणला जात असल्याचे शिवसेनेचे खासदार
संजय राऊत बोलत आहेत, याचा अर्थ त्यामध्ये तथ्य आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या ‘डॉ. सायरस एस. पूनावाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर’चे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला लीला पूनावाला फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोझ पूनावाला, संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, बाबूराव जवळेकर, उदय पुंडे, मोहिनी तेलंग, डॉ. श्याम राजोरे, डॉ. मिलिंद तेलंग, सुभाष अगरवाल, डॉ. आय. एस. मुल्ला, अॅड. भगवान बेंद्रे, जवाहरलाल बोथरा, शशिकांत पवार, दिलीप गिरमकर आणि दुर्गा देशमुख आदी उपस्थित होते.

‘कॅम्प एज्युकेशन सोसायटीची देदिप्यमान परंपरा असून, काळाची गरज ओळखून संस्थेने नव्या पिढीला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षण देण्याचे पाऊल उचलले आहे. संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरमधील परदेशी भाषा, बेकरी उत्पादन, स्पा आदी अभ्यासक्रमांमुळे युवकांना सक्षमपणे स्वयंरोजगार सुरू करता येणार आहे,’ असेही पाटील म्हणाले.

‘समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन सक्षम पिढी घडविण्याचा संस्थेचा मानस आहे. काळाची गरज ओळखून संस्थेने हे सेंटर सुरू केले आहे. त्यातून विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहे,’ असे संचेती म्हणाले.

‘त्या पाटीलांविषयी बोलत नाही’

‘मिशन संपल्याशिवाय मी कोल्हापूरला जाणार नाही,’ असे वक्तव्य नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याविषयी विचारले असता जयंत पाटील म्हणाले की त्यांच्याविषयी मी शक्यतो काही बोलत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments