Sunday, August 16, 2026
Homeअर्थविश्वसंपादकीय- आंदोलने ही प्रतीकं असतात: Gen-Z ने लिहिलेला लोकशाहीचा नवा अध्याय..!! 

संपादकीय- आंदोलने ही प्रतीकं असतात: Gen-Z ने लिहिलेला लोकशाहीचा नवा अध्याय..!! 

“आंदोलने ही केवळ गर्दी नसतात, तर सत्ताधाऱ्यांच्या अहंकाराला आव्हान देणारी लोकशाहीची प्रतीकं असतात.”

इतिहासाची पाने चाळली तर हेच दिसते. महात्मा गांधींचा असहकार आंदोलन , मिठाचा सत्याग्रह असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा काळाराम मंदिर प्रवेश असो वा चवदार तळ्याचा संग्राम — प्रत्येक आंदोलनाने युगांतर घडवले. आज या संघर्षाची सूत्रे Gen-Z (आजच्या तरुणाईच्या) हातात आहेत. कालपर्यंत ज्यांना “फक्त रील्स आणि मीम्स बनवणारी पिढी” म्हणून हिणवले गेले, त्याच तरुणाईने आज सत्तेला झुकवले आहे.

माहितीची मक्तेदारी मोडीत..

पूर्वी आंदोलनाची ताकद वर्तमानपत्रांच्या मथळ्यांवर तर मुख्य टीव्ही चॅनेलवरील ब्रेकिंग न्यूज वर अवलंबून असायची पंरतू आज प्रत्येक विद्यार्थ्याचा मोबाईल हा एक ‘न्यूज रूम’ बनला आहे. मुख्यप्रवाहातील ‘गोदी मीडिया’ने जेव्हा या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले, तेव्हा या पिढीने इन्स्टाग्राम, X (ट्विटर), युट्यूब आणि टेलिग्रामच्या माध्यमातून सत्य थेट देशासमोर आणले.

संयम आणि जिद्दीचा विजय: NEET पेपरफुटी प्रकरण

NEET पेपरफुटीविरोधात पेटून उठलेल्या विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर ठिय्या मांडला. “आम्ही आंदोलनांना घाबरून राजीनामे देत नाही” असा अहंकार बाळगणाऱ्या सत्ताधाऱ्यांना अवघ्या दोन महिन्यांत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला. १२ वर्षांत जे घडले नाही, ते तरुणाईच्या संयमाने आणि सातत्याने करून दाखवले.

आंदोलनात परंपरा, तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटीचा संगम

जंतर-मंतरवर एका बाजूला “इन्कलाब जिंदाबाद”, “जय भीम”, “जय हिंद” आणि “वंदे मातरम्” या लोकशाही आणि संविधानावर निष्ठा सांगणाऱ्या घोषणा घुमत होत्या, तर दुसऱ्या बाजूला सत्तेवर तिरकस भाष्य करणारे मीम्स, डिजिटल बॅनर्स आणि पोस्टर्स होते. Gen-Z ने आंदोलनाला एक नवी सांस्कृतिक भाषा दिली.

डिजिटल अस्त्र अन् संविधानिक लढा

सत्तेने लाठीचार्ज केला, आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, राजकीय प्यादे ठरवले. पण ही पिढी हिंसेच्या मार्गाने गेली नाही. त्यांनी रस्त्यावर उतरून शांततेत लढा दिला आणि प्रत्येक अन्यायाचा डिजिटल पुरावा जगासमोर ठेवला.

अंधभक्तीला पूर्णविराम..? 

आजची Gen-Z कोणत्याही पक्षाची कायमस्वरूपी समर्थक किंवा अंधभक्त नाही. मुद्द्यांवर आधारित पाठिंबा: यांना भाषणांपेक्षा रिझल्ट महत्त्वाचा वाटतो. उत्तरदायित्व: जोपर्यंत काम, तोपर्यंत साथ; अन्यथा थेट प्रश्न. स्वतःचे संशोधन: ही पिढी कोणत्याही आयटी सेलच्या प्रचाराला बळी पडत नाही.

राजकीय व्यवस्थेला स्पष्ट धडा..

हा विजय फक्त सत्ताधाऱ्यांसाठीच नाही, तर विरोधी पक्षांसाठीही एक धडा आहे. आजचा तरुण कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन लढत नाहीये. तो स्वतःच्या भविष्यासाठी लढतोय. त्यामुळे कोणतीही राजकीय पार्टी त्यांना ‘व्होट बँक’ समजण्याची चूक करू शकत नाही.

थोडक्यात सांगायचे तर…

ज्या पिढीला ‘रील्सवाली पिढी’ म्हणून हिणवले गेले, तिने सिद्ध केले की गरज पडल्यास ती रस्त्यावर आणि डिजिटल जगामध्ये एकाच वेळी लढू शकते. लोकशाहीत राजा नसतो, प्रजाच खरी मालक असते — हेच या Gen-Z ने आज इतिहासाच्या पानावर सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवले आहे..!

संकलन 

अविनाश कांबीकर 

पत्रकार। लेखक। दिग्दर्शक 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments