परदेशातील बाजारात तेजी दिसून आल्यानंतर देशातील तेल-तेलबियाच्या बाजारात बुधवारी (१ डिसेंबर) मोहरी, शेंगदाणा आणि सोयाबीन तेल-तेलबियांमध्ये तेजी दिसून आली. तसेच सीपीओ आणि सोयाबीन इंदूर तेलाच्या किमतीत घट झाली. तर काही तेलबियांचे भाव जैसे थे राहिले आहेत. व्यापाऱ्यांनी सांगितले की, मलेशिया एक्सचेंज ०.३४ टक्के आणि शिकागो एक्सचेंज सध्या सुमारे एक टक्क्याने तेजीमध्ये आहे. परदेशातील तेजीमुळे देशांतर्गत बाजारात मोहरी, शेंगदाणा तेल-तेलबियांच्या दरात मोठी सुधारणा झाली. दुसरीकडे, मागणी कमी झाल्याने सीपीओ, सोयाबीन तेल इंदूरचे भाव घसरल्याचेही पाहायला मिळाले.
राजधानी दिल्लीमध्ये १ डिसेंबर २०२० रोजी मोहरी तेलाचे भाव १३६ रुपये प्रति लिटर होते. तर एक वर्षानंतर म्हणजेच १ डिसेंबर २०२१ रोजी मोहरीचे तेल २०३ रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या एक वर्षात मोहरीचे तेल ६७ रुपयांपर्यंत महाग झाले आहे. सूत्रांनी सांगितले की, सलोनी शम्साबाद यांनी मोहरीचा भाव ८,६५० रुपयांवरून ८,९०० रुपये प्रति क्विंटलवर वाढवला, ज्यामुळे मोहरी तेल आणि तेलबियांचे दर वाढले. इतर तेलांची मागणी वाढल्याने भुईमूग तेल आणि तेलबियांच्या किमतीही वधारल्या. ते म्हणाले की, भुईमुगाच्या भावात गेल्या दोन महिन्यात सुमारे ३० रुपये प्रतिकिलो (म्हणजे २० टक्के) घसरण झाली आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकरी कमी भावात सोयाबीन विकत नसल्यामुळे सोयाबीनचे दाणे आणि सोयाबीन लूजचे भाव चांगलेच वाढल्याचे त्यांनी सांगितले.