आठवड्याची सुरुवातच शेअर बाजारासाठी नकारात्मक राहिली आहे. सोमवारी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स तब्बल ११५०अकांनी कोसळला. तर दुसरीकडे निफ्टी देखील १६७०० च्याखाली घसरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये देखील दीड टक्क्यांची घसरण झाली आहे. आज सर्वाधिक फटका हा एचडीएफसी बँक, रिलायन्स, आसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक यांच्या शेअर्सला बसला आहे. बँकिंग क्षेत्रातल्या शेअरमधील गुंतवणूक कमी होताना दिसत आहे.
गेल्या आठवड्यातही होती मंदी..
दरम्यान गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील शेअरबाजाारामध्ये मोठी घसरण झाली होती. सेन्सेक्स ८८९ अंकाच्या घसरणीसह ५७०११ वर बंद झाला होता. निफ्टीमध्ये देखील २६३ अंकांची घसरण झाली होती. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये सुधारणा होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र सोमवार देखील गुंतवणूकदारांसाठी निराशेचा राहिला. आज शेअर मार्केट सुरू होताच मोठी पडझड पहायला मिळाली. शेअर बाजार घसरल्याने एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक नुकसान झाले आहे.
पुढील दोन आठवडे तरी शेअरबाजारात अशीच स्थिती कायम राहाण्याचा अंदाज तज्ज्ञाकडून वर्तवला जातो आहे. याचे मुख्य कारण म्हणजे काही युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे. ज्या देशात प्रादुर्भाव वाढला आहे, तेथील सरकार लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. याचा परिणाम हा अशियाई शेअरबाजारांवर होत असून, गुंतवणूक झपाट्याने कमी होत असल्याने सेन्सेक्स कोसळत आहे.