Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रफ्रान्सनं रोखलेलं 'डंकी फ्लाईट' मुंबईत लँड; २७६ प्रवाशांची घरवापसी; १०० तासांत काय...

फ्रान्सनं रोखलेलं ‘डंकी फ्लाईट’ मुंबईत लँड; २७६ प्रवाशांची घरवापसी; १०० तासांत काय काय घडलं?

फ्रान्समध्ये ४ दिवस अडकलेलं ‘डंकी विमान’ भारतात परतलं आहे. फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणांनी मानवी तस्करीच्या संशयावरुन रोखून धरलेलं विमान अखेर मुंबईत लँड झालं. विमान फ्रान्सला पोहोचलं तेव्हा त्यात ३०३ भारतीय होते. आज विमान मुंबईत उतरलं तेव्हा त्यामध्ये २७६ प्रवासी होते. यातील बहुतांश भारतीय नागरिक आहेत. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलांसोबत २५ जणांनी फ्रान्समध्ये शरणार्थी म्हणून राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ते फ्रान्समध्येच आहेत.

दोन अल्पवयीन मुलांना न्यायमूर्तींसमोर हजर करण्यात आलं. त्यांना साक्षीदार म्हणून सोडण्यात आलं. जवळपास १०० तास ३०३ प्रवासी फ्रान्समध्ये अडकले होते. सरकारपासून विविध यंत्रणा सक्रिय झाल्या. प्रवाशांच्या घरवापसीसाठी अथक प्रयत्न झाले. अखेर या प्रयत्नांना यश आलं आणि फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणांनी रोखून ठेवलेलं विमान भारतात परतलं.

नेमकं काय घडलेलं?
रोमानियाच्या लीजेंड एअरलाईन्सचं विमान गुरुवारी दुबईहून निकाग्वाराला जात होतं. त्यात ३०३ भारतीय प्रवासी होते. त्यात ११ अल्पवयीन होते. फ्रान्सची राजधानी पॅरिसपासून १५० किमी अंतरावर असलेल्या वेट्री विमानतळावर हे विमान इंधन भरण्यासाठी थांबलं. यानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या प्रवासाच्या हेतूंची चौकशी सुरू केली. ते नेमके कशासाठी चालले आहेत याचा तपास सुरू झाला. संघटित गुन्हेगारीचा तपास करणाऱ्या पथकानं मानव तस्करीच्या संशयावरुन तपास सुरू केला.

जवळपास १०० तासांचा तपास आणि प्रवाशांच्या चौकशीनंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी विमान रवाना करण्यास हिरवा कंदिल दिला. गुरुवारपासून रविवारपर्यंत उभं असलेलं विमान अखेर भारतात परतलं. एअरबस ए३४० च्या चालक दलातील सर्वांच्या चौकशीनंतर त्यांना उड्डाणाची परवानगी देण्यात आल्याचं एअरलाईन्सच्या वकील लिलियाना बकायोको यांनी सांगितलं.

काही प्रवासी त्यांच्या मूळ देशांमध्ये परत जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे विमानाच्या उड्डाणास उशीर झाला. फ्रान्सच्या यंत्रणांनी विमानाला उड्डाण करण्यास परवानगी दिल्यानंतर फ्रान्समधील भारतीय दुतावासानं फ्रान्स सरकार आणि वॅट्री विमानतळ प्रशासनाचे आभार मानले.

एअरलाईन्सच्या वकील लिलियाना बकायोको यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवाशांनी सोमवारी सकाळी विमानात चढण्यास नकार दिला होता. फ्रान्सच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काही प्रवाशांना निकाग्वाराला जायचं होतं. त्यांना मायदेशी परतण्याची इच्छा नव्हती. ‘आम्ही यापुढेही तपास यंत्रणांना सहकार्य करू. एअरलाईन्सचं बरंच आर्थिक नुकसान झालं असल्यानं ग्राहकांकडून नुकसान भरपाई घेण्यात येईल,’ असं बकायोको म्हणाल्या

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments