३० डिसेंबर
पुण्यात सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणची वाहतूक वळविण्यात आली आहे. आता त्याचाच एक भाग म्हणून, मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगर एस. टी. स्टँड वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. एस. टी. प्रशासनाकडून याची माहिती देण्यात आली आहे.
शिवाजीनगर एस. टी.आगाराच्या जागी प्रस्तावित असलेले पुणे मेट्रोच्या स्थानकाचे काम सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे या ठिकाणचे एस. टी.चे बस स्थानक आणि आगार आजपासून (दि.३०) वाकडेवाडी येथे स्थलांतरीत करण्यात येत आहे.
या पत्रकानुसार, शिवाजीनगर बसस्थानकातून सुटणाऱ्या बस फेऱ्या सोमवार ३० डिसेंबर २०१९ पासून नवीन बसस्थानक वाकडेवाडी, शिवाजीनगर येथून सुटणार आहेत. “शिवाजीनगर एस. टी. स्थानकाच्या जागेवर भुमिगत मेट्रो स्थानक होणार आहे. या कामासाठी शिवाजीनगरचे स्थानक वाकडेवाडी येथे तीन वर्षांसाठी स्थलांतरित करण्यात येत आहे. तीन वर्षानंतर पुन्हा त्याच ठिकाणी एस. टी. स्थानक तयार होणार आहे,” अशी माहिती पुणे विभागीय एस. टी. नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.