पिंपरी परिसरातील नागरिकांची बऱ्याच वर्षांची वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील डेअरी फार्म येथील मुंबई-पुणे रेल्वे फाटकावर ५६५ मीटर लांबीचा रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
दापोडी-निगडी रस्त्याला पॉवरहाऊस चौकाशी जोडणारा हा उड्डाणपूल झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या वाढत्या मागणीला विचारात घेऊन उभारण्यात येत आहे. चार पदरी असणाऱ्या या उड्डाणपुलामध्ये छोट्या वाहनांसह अवजड वाहने पेलण्याचीही क्षमता असणार आहे. हा प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी आणि आसपासच्या भागातील प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे.
या प्रकल्पामुळे नागरिकांना सुविधा, सुरक्षितता आणि इंधन बचतीच्या दृष्टीने फायदा होणार आहे. रेल्वे उड्डाणपूल ही पिंपरी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची दीर्घकाळापासूनची मागणी होती. उड्डाणपुल नसल्याने या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे आणि रेल्वे फाटकावर दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. या उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर नागरिकांच्या या समस्या दूर होणार असून पुणे मुंबई महामार्गावर तसेच तुकाराम नगर मेट्रो स्टेशनपर्यंत जलद आणि सहज पद्धतीने प्रवास करण्यासाठी मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील हवा प्रदूषण तसेच ध्वनी प्रदूषणही कमी होणार आहे.