गर्लफ्रेण्डला इन्स्टाग्रामवर मेसेज केल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाचा दिवसाढवळ्या खून केल्याची घटना नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
गर्लफ्रेण्डला इन्स्टाग्रामवर (Instagram) मेसेज केल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाचा दिवसाढवळ्या खून (Murder) केल्याची घटना नागपूरच्या (Nagpur) जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. बाराखोलीजवळच्या रिपब्लिकन नगरमध्ये गुरुवारी (29 जून) लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने तरुणाची हत्या करण्यात आली. श्रेयांश पाटील असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अमित मेश्राम असं आरोपीचं नाव आहे.
इन्स्टाग्राम मेसेजवरुन वाद
आरोपी अमित मेश्राम आणि श्रेयांश पाटील दोघांची एका युवतीसोबत मैत्री होती. घटनेचा सूत्रधार अमित मेश्रामने काही दिवसांपूर्वी श्रेयांशच्या गर्लफ्रेण्डला इन्स्टाग्रामवर स्तुती करणारे मेसेज पाठवले होते. त्यानंतर गर्लफ्रेण्डने ही स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली. ते पाहून श्रेयांश संतप्त झाला. त्याने अमितला इन्स्टाग्रामवर मेसेज करुन त्याच्या गर्लफ्रेण्डला मेसेज न करण्याची धमकी दिली. यावरुन त्यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता आणि तो वाढत गेला.
नेमकं काय घडलं?
यानंतर अमित आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालक गुरुवारी (29 जून) श्रेयांशच्या घरी आले. त्यांनी श्रेयांशला चर्चा करण्यासाठी बौद्ध विहाराजवळ चलण्यास सांगितले. श्रेयांशनेही धोका ओळखून सोबत चाकू घेऊन गेला होता. बौद्ध विहाराजवळ श्रेयांशची आरोपींसोबत मारहाण झाली. आरोपींजवळ रॉड होते. त्यांनी रॉडने हल्ला केल्यानंतर श्रेयांशजवळील चाकू हिसकावून त्याच्यावर वार केला. त्याला गंभीर जखमी करुन तिथून आरोपी फरार झाले. उपचारादरम्यान आरोपीचा मृत्यू झाला. उपनिरीक्षक प्रदीप कायटे यांच्या नेतृत्वाखाली जरीपटका पोलिसांच्या पथकाने काही तासात अमित मेश्रामसह तीन आरोपींना अटक केली. आरोपींमधील दोन जण अल्पवयीन आहेत. या प्रकरणाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जात होता. परंतु इन्स्टग्राम मेसेजवरुन वाद झाल्याने हे हत्याकांड घडलं, अशी माहिती पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी दिली.
दरम्यान श्रेयांश पाटील हा जरीपटका परिसरातील एका कापडाच्या दुकानात कामाला होता. तर अमित मेश्रामवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर त्याचे वडील गणपत मेश्राम हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे.
प्रेमसंबंधांवरुन झालेली आठवडाभरातील दुसरी हत्या
प्रेमसंबंधांवरुन हत्याकांड घडल्याची गेल्या काही दिवसांतील ही दुसरी घटना आहे. अजनी इथे या आठवड्याच्या सुरुवातीला 28 वर्षीय निखिल उके याची त्याच्या मैत्रिणीच्या भावाने हत्या केली होती. तरुणीने लग्नाला नकार दिल्यानंतरही निखिल उके तिच्याव दबाव टाकत होता. यामुळे संतापलेल्या तरुणीच्या भावाने त्याच्या मित्रांसह निखिल उकेला जीवे मारलं. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली होती.