Monday, December 4, 2023
Homeमहाराष्ट्रनिकृष्ट दर्जाच्या कामामुळे नव्याकोऱ्या तारांगणाला पाच महिन्यांतच गळती, घुमटाच्या दुरुस्तीसाठी लागणार २०...

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नव्याकोऱ्या तारांगणाला पाच महिन्यांतच गळती, घुमटाच्या दुरुस्तीसाठी लागणार २० लाख रुपये

आकाशगंगा, पृथ्वीवरील वातावरण, वातावरणातील बदल, आकाशातील ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्य, पृथ्वीची माहिती घेण्यासाठी पिंपरी महापालिकेने मोठा गाजावाजा करून उभारलेल्या तारांगण प्रकल्पाला अवघ्या पाच महिन्यांत गळती लागली आहे. त्यामुळे तारांगणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत असून, तारांगणाच्या घुमटाच्या दुरुस्तीसाठी आता पुन्हा वीस लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.

अंतराळ क्षेत्राची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यांना या विषयात रस निर्माण होण्यासाठी पिंपरी महापालिकेने चिंचवड येथील सायन्स पार्कजवळ तारांगण प्रकल्प उभारला आहे. ११ कोटी १२ लाख ४३ हजार रुपयांचा खर्च त्यासाठी करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मे महिन्यात या तारांगणाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर तारांगण पाहण्यासाठी शहरातील विद्यार्थी, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही दिवसांतच पावसाचे पाणी तारांगण प्रकल्पातील १५ मीटर व्यासाच्या घुमटातून गळू लागले. त्यामुळे तारांगण प्रकल्प काही दिवस बंद ठेवण्याची वेळ आली. आता या घुमटाची दुरुस्ती करावी लागणार आहे. मात्र घुमटाची दुरुस्ती कणाऱ्या संस्थांची संख्या कमी असल्याने महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली आहे.

काचेच्या सांध्यातून (जॉइंट) पावसाच्या पाण्याची गळती होऊ नये म्हणून कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार आहे. या सांध्याला आता धातूची पट्टी बसविण्यात येणार आहे. घुमटाच्या दुरुस्तीसाठी २० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील नदीकाठचा १८ मीटर विकास आराखड्यातील रस्ता विकसित करण्यासाठीच्या एक कोटी ५० लाखांच्या निधीतून २० लाख रुपयांचा निधी तारांगण दुरुस्तीसाठी वळवण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

घुमटाची दुरस्ती करण्याबाबत सल्लागाराने सुचविले आहे. त्यानुसार निविदा काढून दुरस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. – राजेंद्र शिंदे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments