घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज (गुरुवार २० जुलै) आणि उद्या (शुक्रवार २१ जुलै) पुणे जिल्ह्यातील ३५५ शाळा बंद
पुण्यातील दुर्गम भागातील शाळा आज आणि उद्या असे दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी रात्री घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी काल रात्री घाट भागात झालेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज (गुरुवार २० जुलै) आणि उद्या (शुक्रवार २१ जुलै) दुर्गम भागात असलेल्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भागातील अंगणवाड्याही आज आणि उद्या बंद ठेवल्या जाणार आहेत.आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, पुरंदर, मुळशी, मावळ या तालुक्यातील अवघड क्षेत्रातील ३५५ शाळा आज आणि उद्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.
ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि सीडीपीओ यांनी परिसरात असणे आणि सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहतील. हा आदेश अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद, सर्व मंडळांशी संलग्न अनुदानित व खाजगी शाळांना लागू आहे. इतर सर्व भागातील शाळा आणि अंगणवाड्या सामान्यपणे चालू राहतील, असेही आदेशीत करण्यात आले आहे.
दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून अवघड क्षेत्रात असणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अवघड भागात असणाऱ्या शाळांमध्ये दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली असून पावसाचा जोर बघता पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून योग्य त्या उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.