Tuesday, February 18, 2025
Homeमहाराष्ट्रडॉ. सुहास दिवसे पुणे शहराचे नवे जिल्हाधिकारी .. तर त्यांच्या जागी क्रीडा...

डॉ. सुहास दिवसे पुणे शहराचे नवे जिल्हाधिकारी .. तर त्यांच्या जागी क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये बहुप्रतिक्षित आणि चर्चेत असलेल्या पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. सुहास दिवसे यांची अखेर नियुक्ती करण्यात आली. तर त्यांच्या जागी क्रीडा आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. दोन्ही अधिकारी पुण्यात होते आणि आताही बदलीनंतरही पुण्यात राहिल्याचे स्पष्ट झाले.

पुण्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांची बदलीही प्रतिक्षेत होती. त्यामुळे जिल्हाधिकारीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. अखेर क्रीडा आयुक्त दिवसे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. जिल्हाधिकाऱ्यांची बदली गेल्या आठवड्यापासून प्रतीक्षेत होती. अखेर राज्य सरकारने दिवसे यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केल्याचे आदेश बुधवारी सायंकाळी जारी केले. दिवसे हे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या ‘गुडबुक’मधील असल्याचे मानले जाते. दिवसे यांनी २००४ ते २००७ मध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी पदी काम पाहिले आहे. त्याशिवाय त्यांची कारकिर्दही पुण्यात सुरू झाली.

पुण्यात प्रोफेशनरी उपजिल्हाधिकारी म्हणून १९९५ साली काम केले. त्यानंतर खेड तालुक्याचे प्रांताधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे विभागीय आयुक्तालयात विभागीय उपायुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त आणि राज्याचे क्रीडा आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात सर्वाधिक काळ राहणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये दिवसे यांचे नाव घेतले जाते. यापूर्वी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी पुण्यात सर्वाधिक काळ अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या नंतर दिवसे यांचा क्रमांक लागत असल्याचे प्रशासनात चर्चा सुरू आहे.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००८ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांची पुण्याच्या जिल्हाधिकारी पदी १९ ऑगस्ट २०२० मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा तीन वर्षांचा कालावधी गेल्या वर्षीच संपुष्टात आला होता. मात्र, चांगल्या नियुक्तीच्या ते प्रतीक्षेत होते. अखेर सरकारने पुण्यात राज्याचे क्रीडा आयुक्तालयात त्यांची नियुक्ती केली आहे. डॉ. देशमुख यांनी यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. तसेच हाफकिन इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

पुण्यालाच सर्वाधिक पसंती

राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत धक्कातंत्र वापरले. तत्कालीन विभागीय आय़ुक्त सौरव राव यांना पुण्याबाहेर पाठविण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, राव यांची पुण्यात सहकार आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्याशिवाय साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंदवार यांची विभागीय आयुक्तपदी, तर सहकार आयुक्त अनिल कवडे यांची साखर आयुक्त पदी नियुक्ती करून त्यांचा चार वर्षांचा कालावधी पूर्ण होऊन त्यांची नियुक्ती पुण्यात करण्यात आली. त्यापाठोपाठ दिवसे आणि डॉ. देशमुख यांची नियुक्तीही येथे केल्याने सनदी अधिकाऱ्यांची पुण्याला सर्वाधिक पसंती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments