शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रचारात रंगत वाढली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील हे दोघे सोमवारी (२९ एप्रिल) खेडमध्ये एकत्र आले. दोघांनीही एकमेकांचे पाय धरले. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरची लढत प्रतिष्ठेची केली आहे. त्यांच्याकडून सातत्याने डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल केला जातो. तसेच डॉ. कोल्हे आणि आढळराव यांच्यातही आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. असे असताना सोमवारी दोघेही एकत्र आले. खेडमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने दोघे एकत्र आले होते. डॉ. अमोल कोल्हे हे शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या पाया पडले. यानंतर आढळराव हे देखील डॉ. कोल्हे यांच्या पाया पडले. खासदार डॉ. कोल्हे यांनी ज्येष्ठत्व म्हणून आढळराव यांचे पाय धरले असले, तरी आढळरावांनी पाय धरण्यामागे त्यांना डॉ. कोल्हेंचा आलेला पूर्वानुभव तर नसेल ना? अशी चर्चा यानिमित्ताने रंगली. यावेळी दोघे शेजारी बसून संवाद साधतानाही दिसून आले. आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यावेळी उपस्थित होते.


