डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे येथे जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून दिनांक 27 एप्रिल रोजी डॉ. डी. वाय. पाटील सभागृहात आंतरराष्ट्रीय नृत्य परिषदेचे आयोजन सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. सौ. भाग्यश्रीताई पी. पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलाने झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वस्त व कार्यकारी संचालक डॉ. स्मिता जाधव, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार व कुलसचिव डॉ. ए. एन. सूर्यकर हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा सत्कार डॉ. डी. वाय. पाटील स्कुल ऑफ लिबरल आर्टस्, पिंपरी, पुणेचे संचालक डॉ. नंदकिशोर कपोते, प्रा. डॉ. स्वाती दैठणकर, श्रीमती निकिता मोघे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तिका प्रा. स्वाती दैठणकर यांच्या नृत्याने झाली. त्यांनी ‘भजे गोविंदम’ व ‘शबरी’ यावर अप्रतिम भरतनाट्यम नृत्य सादर केले. यानंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ. पंडित नंदकिशोर कपोते यांनी कथक नृत्य सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी ‘बाजे रे मुरलिया बाजे’ यावर भाव प्रस्तुत करुन कथक नृत्यातील विविध प्रकार तोडे-तुकडे, पदसंचालन आदि प्रकार सादर केले. त्यांनी सादर केलेली जुगलबंदी व श्री गजानन महाराज यांची आरती यास सर्व प्रेक्षकांनी उभे राहुन भरभरुन दाद दिली. त्यांना तबलासाथ पंडित कालीनाथ मिश्रा, गायनसाथ पंडित संजय गरुड, सितारसाथ अलका गुजर, बासरीसाथ अजहरुद्दीन शेख, पखावजसाथ ज्ञानेश कोकाटे यांनी केली. यानंतर डॉ. नरेंद्र कडू (संचालक- शैक्षणिक) यांचे गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला. त्यांनी अभंग, भजन आदि प्रकार सादर केले.
यानंतर खास जागतिक नृत्य परिषदेसाठी देश-विदेशातुन आलेल्या नृत्य कलाकारांनी शोध-निबंध प्रस्तुत केले. यात दिल्ली- रजनी राव, राहुल रजक, कुवैत- किरण जावा, अमेरिका- किरण चव्हाण, हैद्राबाद- प्रेरणा अग्रवाल, प्रियंका भारदे , सोलापुर- मनिषा जोशी, मुंबई- डॉ. सुनिल सुंकारा, पौलमी मुखर्जी, स्मृती तळपदे, अक्षोभ्य भारद्वाज, अमृता साळवी, पुणे- डॉ. परिमल फडके, मुग्धा डिसुझा, अमला शेखर, आकांक्षा ब्रह्मे, रोहिणी कुलकर्णी , भोपाळ- कविता तिवारी, जयपुर- मनस्विनी शर्मा आदि नामवंत कलाकार सहभागी झाले होते. त्यांनी नृत्य शिल्प, नृत्य साहित्य, नृत्य शास्त्र, नृत्य मानसशास्त्र अशा विविध विषयांवर शोध निबंध प्रस्तुत करुन शास्त्रीय नृत्यही सादर केले. रसिकांच्या भरघोस प्रतिसादाने संपुर्ण कार्यक्रम यशस्वी व रंगतदार झाला.