Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीघरोघरी तिरंगा मोहिमेस महापालिकेच्या वतीने आजपासून प्रारंभ

घरोघरी तिरंगा मोहिमेस महापालिकेच्या वतीने आजपासून प्रारंभ

घरोघरी तिरंगा मोहिम ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्याच्या सूचना राज्यशासनामार्फत प्राप्त झाल्या असून आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इनोव्हेटीव स्कूल मोशी यांच्या वतीने आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचा प्रारंभ उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते झाला.

या रॅलीदरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी तथा उप आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक सुरज पवार तसेच आशिष काळदाते, वैभव फापडे, धनराज नाईकवाले, इनोव्हेटिव्ह शाळेचे अध्यक्ष संजय सिंग, प्रशांत पाटील, आरोग्य विभागाचे तानाजी दाते तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आनंद नागरे, आनंद मोरे सहभागी झाले होते. तसेच भालचंद्र देशमुख, भिकाजी थोरात या जेष्ठ नागरिकांनीही या मोहिमेत उत्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षीही राज्य शासनाच्या वतीने घरोघरी तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भव्य रॅलीच्या माध्यमातून या मोहीमेस घरोघरी प्रारंभ करण्यात आला. या भव्य रॅलीत चिखली येथील इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलमधील ७०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत जल्लोषात्मक घोषणाबाजी केली.

चिखली जाधववाडी येथील सीएनजी पंप ते शाळेपर्यंत ३ किलोमीटर पायी रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात प्रवेश करताच सर्व नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. या चिमुरड्यांच्या सहभागाने हर घर तिरंगा रॅली उत्साह आणि जल्लोषात्मक वातावरणात पार पडली.

‘’घरोघरी तिरंगा’’ मोहीम राबवण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानी दिलेल्या सूचनांचे पालन करून विविध उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी तात्काळ नियोजन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेत घेण्यात येणारे तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा असे विविध उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहेत.

यावेळी वरिष्ठ निरीक्षक सूरज पवार यांनी विद्यार्थ्यांना स्कूल बसमधून प्रवास करताना किंवा रस्त्यावरून चालताना घ्यावयाची काळजी आणि सुरक्षेच्या उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले. तर उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या पर्यावरणाला आणि पृथ्वी मातेला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याचे शपथ देऊन पटवून दिले. या मोहिमेच्या शुभारंभावेळी शालेय विद्यार्थ्यांना माझी वसुंधराची शपथ देण्यात आली तसेच डेंग्यू बाबत जनजागृती देखील करण्यात आली.

नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना आणि राष्ट्रध्वजाबद्दल जनजागृती करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असून यावर्षी सुद्धा हर घर तिरंगा मोहीम उत्साहात साजरी करण्यात यावी हे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यानुसार सर्व नागरिकांनी हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments