१४ जुलै २०२१,
शहरातील एका नामवंत वैद्यकीय शैक्षणिक संस्थेतील प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीच्या खोलीत छुपे कॅमेरे लावणाऱ्या एका डॉक्टरला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. डॉ. सुजित आबाजीराव जगताप (वय ४२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.डॉक्टर सुजितने छुपा कॅमेरा असणारा बल्ब अमेझॉनवरून मागवला असल्याचं तपासात समोर आलं आहे. तक्रारदार युवती डॉक्टर वैद्यकीय शैक्षणिक संस्थेच्या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करते. शैक्षणिक संस्थेच्या आवारातील निवासी वसतिगृहात राहायला आहे. गेल्या आठवडय़ात खोलीतील दिवे बंद असल्याने तिने विद्युत दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्याला बोलाविले. त्या वेळी खोलीत छुपे कॅमेरे (स्पाय कॅमेरे) लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी संशयावरून वसतिगृहातील कर्मचारी, सुरक्षारक्षकांची चौकशी केली.
पोलिसांनी वसतिगृहाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले. चित्रीकरणात डॉ. जगताप वसतिगृहात गेल्याचे आढळून आले होते. डॉ. जगताप याची पोलिसांनी चौकशी केली.गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता यादव तपास करत आहेत. या प्रकरणात डॉ. जगताप याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले होते. अशाच प्रकारचे किती गुन्हे आरोपीने केले आहेत, याची माहिती मिळावी, याबाबत पुणे पोलीस आयुक्तांना नीलम गोऱ्हे यांनी निवेदन सादर केले. पोलिसांनी लवकरात लवकर या प्रकरणाची चौकशी करावी म्हणजे असे अनेक गुन्हे समोर येऊन समाजातील सर्व महिलांना तसेच फिर्यादी महिला डॉक्टरांना न्याय मिळेल, असेही मत डॉ नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले होते. आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला जामीन मिळू नये, याची दक्षता घेण्यात यावी. अशा अपप्रवृत्तीच्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाल्यास समाजात या गुन्ह्याची पुनरावृत्ती होणार नाही, त्याला निश्चितच आळा बसेल असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले होते. महिलांनीही सजग राहून सावधानता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले होते.