पराभवाची हॅट्ट्रिक केल्यानंतर पाकिस्तानला २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘करो या मरो’ सामना खेळावा लागणार आहे. या सामन्यात हरल्यास बाद फेरीचा मार्ग तर बंद होईलच, पण बाबर आझमचे कर्णधारपदही धोक्यात येऊ शकते. पाकिस्तानच्या खराब कामगिरीमुळे टीकेला सामोरे जाणाऱ्या बाबरला या सामन्यात पराभूत होण्याचे परिणाम काय होऊ शकतात,हे माहित आहे. आतापासून पाकिस्तानला प्रत्येक सामना जिंकावा लागेल आणि ऑस्ट्रेलियाने उर्वरित चारपैकी किमान दोन सामने गमावावेत अशी आशा करावी लागेल.
दक्षिण आफ्रिकेच्या नावावर कदाचित आयसीसी ट्रॉफी नसेल पण संघाला पराभूत करणे कधीही सोपे नसते. एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने सर्व संघांविरुद्ध ५० टक्क्यांहून अधिक सामने जिंकले आहेत. त्याची पाकिस्तानविरुद्धची विजयाची टक्केवारी ६३ आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ८२ एकदिवसीय सामने झाले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने ५१ सामने जिंकले आहेत तर पाकिस्तानने केवळ ३० सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागला नाही. मात्र, गेल्या १० वनडेत पाकिस्तानने ६ विजय मिळवले आहेत.
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड
एकूण सामने – ८२
पाकिस्तानचा विजय – ३०
दक्षिण आफ्रिकेचा विजय – ५१
टाय- १
वर्ल्डकपबद्दल बोलायचे तर पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जवळपास बरोबरीची स्पर्धा झाली आहे. उभय संघांमध्ये ५ वेळा सामना झाला असून यामध्ये दक्षिण आफ्रिका ३-२ ने पुढे आहे. मात्र, १९९९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात शेवटचा विजय मिळवला होता. २०१५ मध्ये पाकिस्तानने २९ धावांनी आणि २०१९ मध्ये ४९ धावांनी सामना जिंकला होता. पाकिस्तान संघाला ही विजयी मालिका कायम ठेवायची आहे.
फॉर्म दक्षिण आफ्रिकेसह
पाकिस्तान संघ कधी काय करेल हे कोणालाच माहीत नाही, असे क्रिकेटविश्वात बोलले जाते, पण फॉर्म मात्र दक्षिण आफ्रिकेकडे आहे. त्याचे सर्व फलंदाज लयीत खेळत आहेत. क्विंटन डी कॉक हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. क्लासेन गोलंदाजांना समोर टिकू देत नाहीय. दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाजही चांगलेच लयीत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना रोखणे पाकिस्तानला सोपे जाणार नाही.