कोरोना काळात एकीकडे सर्वच क्षेत्रं डबघाईला आले होते तसेच रिअल इस्टेट क्षेत्रही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. मात्र आता लॉकडाउननंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना रिअल इस्टेट वर्तुळात एका व्यवहाराची चर्चा होत आहे. या व्यवहाराची किंमत आहे तब्बल १००० कोटी; डी-मार्ट रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी मुंबईतील मलबार हिलमध्ये तब्बल १००० कोटींचा घरखरेदीचा व्यवहार केला आहे. नारायण दाभोळकर मार्गावरील मधू कुंज या इमारतीत हे घर आहे. या विक्रमी व्यवहाराची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.
३१ मार्चला हा व्यवहार झाला. राधाकृष्ण दमानी यांनी मलबार हिलमध्ये १००० कोटींना विकत घेतलेल्या या घरासाठी ३० कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. बाजारभावानुसार या घराची किंमत ७२४ कोटी रुपये आहे. ५७५२.२२ चौरस फुटांच्या घराचा हा व्यवहार सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात चर्चेचा विषय आहे.
राधाकृष्ण दमानी हे ‘डी-मार्ट’चे मालक आहेत. भारतातल्या किराणा मालाच्या अनेक यशस्वी चेन्सपैकी डी-मार्ट ही एक चेन आहे. भारतातील श्रीमंतांच्या यादीत राधाकृष्ण दमानी यांचा समावेश आहे. नेहमी पांढरा शर्ट आणि पांढरी पँट अशी स्टाईल असणाऱ्या राधाकृष्ण दमानी यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखलं जातं. राधाकृष्ण दमानी हे प्रसारमाध्यमं तसंच सोशल मीडिया या सर्व गोष्टींपासून दूरच असतात.
राधाकृष्ण दमानी शेअर बाजारातही गुंतवणूकदार आहेत. राधाकृष्ण दमानिया यांनी २०१७ मध्ये त्यांच्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी केल्यानंतर दोनच दिवसांत संपत्तीमध्ये ६१०० कोटी रूपयांची वाढ झाली होती.