Tuesday, April 21, 2026
Homeताजी बातमीदिव्यांग बांधवांना सन्मानाने जगण्यासाठी दिव्यांग भवन ठरत आहे भक्कम आधार – महापौर...

दिव्यांग बांधवांना सन्मानाने जगण्यासाठी दिव्यांग भवन ठरत आहे भक्कम आधार – महापौर रवि लांडगे

दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या संचालक मंडळाची बैठक संपन्न

दिव्यांग बांधवांसाठी उभारण्यात आलेले दिव्यांग भवन हे केवळ सुविधा केंद्र नसून त्यांना सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगण्यासाठीचा भक्कम आधार ठरत आहे. येथे उपलब्ध सोयी-सुविधा आणि फाऊंडेशनच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

मोरवाडी येथील दिव्यांग भवन येथे दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या संचालक मंडळाची बैठक आज महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस मा. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, मा. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, सचिव गिरीश परळीकर, सल्लागार अभिजीत मुरुगकर, विजय कान्हेकर, प्रशासकीय अधिकारी पूजा भापकर तसेच सीएसआर सेलच्या श्रुतिका मुंगी आदी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे म्हणाले, “दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केवळ पायाभूत सुविधा उभारणे पुरेसे नाही, तर त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. दिव्यांग भवनाच्या माध्यमातून शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासाच्या अधिकाधिक संधी निर्माण करून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.” तसेच दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधा अधिक व्यापक करण्यासोबतच कौशल्य विकास आणि जनजागृती उपक्रमांना गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मा. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी दिव्यांगांच्या समस्या समजून घेऊन करण्यात येणारे हे कार्य ही मोठी समाजसेवा असल्याचे नमूद केले. दिव्यांग बांधवांना सक्षम करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मा. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिव्यांगांच्या सिंगल पॅरेंट्ससाठी विशेष उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली. तसेच दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिव्यांगांसाठी अधिक प्रभावी सुविधा निर्माण करण्याबाबत सूचना मांडल्या. यामध्ये हायड्रोथेरपीसाठी स्वतंत्र सुविधा आणि फिजिओथेरपी केंद्र उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधांचा विस्तार, नव्या उपक्रमांची अंमलबजावणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर सखोल चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी यांनी दिव्यांग भवनच्या कार्याचा सविस्तर आढावा सादर केला. यामध्ये इमारतीचा आराखडा, विविध उपक्रम, जनजागृती मोहिमा, कौशल्य विकास कार्यक्रम तसेच ‘पर्पल जल्लोष’ या दिव्यांग महोत्सवाबाबत माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments