चित्रपट हे खूप मोठ्या ताकदीचे माध्यम आहे, त्यामुळे चित्रपट दिग्दर्शकांनी त्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक जान्हू बरुआ यांनी केले.
बाविसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जान्हू बरुआ ‘फिल्ममेकर पॅशन, हंडलिंग ॲक्टर्स अँड नॉन ॲक्टर्स’, या विषयावर बोलत होते. त्यांच्याशी समर नखाते, अंजु दासवानी, फिरोजी अंजीरबाग यांनी संवाद साधला.
जान्हू बरुआ म्हणाले, की समाज बदलासाठी चित्रपट हे खुप प्रभावी आणि ताकदीचे माध्यम आहे आणि चित्रपट निर्माता त्याद्वारे समाजाच्या घडणीत योगदान देत असतो. चित्रपटांनी समाजात विध्वंस घडवून आणता कामा नये तर सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
जान्हू बरुआ पुढे म्हणाले, “चित्रपटांमध्ये स्थानिक संस्कृती,परंपरा आणि निसर्गाचे प्रतिबिंब दिसायला हवे. माणसाचे नातेसंबंध, त्यातील संवेदनशीलता, त्यातून पुढे येणारी मानवतावादी मूल्ये, या सर्वांचे चित्रण चित्रपटात व्हायला हवे. सामाजिक वास्तव हाताळण्यात चित्रपटांची भूमिका महत्त्वाची असते आणि चित्रपट निर्मात्याचे हे कर्तव्य आहे की त्याने सजग राहून सामाजिक परिस्थिती बद्दल भाष्य केले पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
जान्हू बरूआ यांनी असामी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शनाचा ठसा उमटवला आहे.
हलोदिया, अपरुपा, फिरींगोती, मैने गांधी को नही मारा, कोणीकर रामधेनू, बंधोन आणि अजेयो हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. मानवतावादी विषयांना हात घालून संवेदनशील आशय निर्माण करणाऱ्या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात.
अंजू दासवानी आणि फिरोझी अंजिरबाग यांच्याशी संवाद साधताना बरूआ यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मधील त्यांचे अनुभव कथित करत असताना त्यांनी मृणाल सेन यांच्या सोबतचा किस्सा प्रेक्षकांना सांगितला.
चित्रपट निर्मिती बद्दल बोलताना, ते म्हणाले, “कल्पनाशक्ती ही चित्रपट निर्मितीची पहिली पायरी आहे आणि चित्रपट निर्मिती चित्रसंपत्ती आहे. त्याचा योग्य वापर केला पाहिजे.” आपले बालपण, निसर्गासोबतचे आणि आसामी संस्कृतीशी असलेले घट्ट नाते, त्यातून त्यांना मिळालेली प्रेरणा आणि त्या आधारे घडत गेलेल्या कलाकृती आपल्या चित्रपटात येत असल्याची त्यांनी सांगितले.
बरुआ यांनी आपल्या चित्रपटात अनेक नवीन चेहऱ्यांना पडद्यावर आणले आहे. ‘हलोदिया’ या चित्रपटनिर्मितीचा अनुभव सांगताना चित्रपटातील मुख्य पात्र इंद्र बनिया याची निवड एका बाजारात फिरत असताना केली गेली आणि त्याच्यावर ६ महीने काम करून पुढे उत्तम अभिनय करून घेण्यात आला असे ते म्हणाले. त्याच बरोबर एच बी डी या चित्रपटातील लहान मुलाचे पात्र हा देखील एक नॉन ॲक्टर चेहरा होता आणि त्याच्याकडून अभिनय करून घेण्याचे आव्हान होते, असे त्यांनी सांगितले.
.