काही दिवसांपूर्वी जिओ स्टूडियोजतर्फे त्यांच्या एकूण १०० चित्रपटांची मोठी घोषणा करण्यात आली. यात मराठीमधील अनेक दर्जेदार अशा चित्रपट आणि वेब सीरिजची घोषणा करण्यात आली. यातील महत्वाची घोषणा म्हणजे नागराज मंजुळे यांचा दिग्दर्शक म्हणून फॅंड्री, सैराट नंतरचा तिसरा मराठी चित्रपट म्हणजे खाशाबा!
भारताला सर्वप्रथम वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून देणारा मराठमोळा कुस्तीपटू म्हणजे ‘खाशाबा दादासाहेब जाधव.’ यांच्याच जीवनावर आधारीत चित्रपटाची घोषणा नागराज यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. आज नागराज यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘खाशाबा’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.
आतापर्यंत अनेक चित्रपट वेगवेगळ्या खेळांवर तसेच खेळाडूंवर बनविण्यात आले आहेत. त्यातील काही बॉक्स ऑफिसवर यशस्वीही झाले. आता मराठीतही बायोपिकचे वारे वाहू लागल्यामुळे खाशाबा सिनेमा कसा असणार हे पाहाणं औत्सुक्याचं असणार आहे. हा मराठीतील पहिला भव्यदिव्य बायोपिक असेल असे म्हटले जात आहे.
याबद्दल बोलताना नागराज मंजुळे म्हणाले की, ‘सिनेमाच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन तर करायचंच आहे. पण त्यासोबतच अशा खऱ्या, अस्सल मातीतील खेळाडूची ओळख जगाला करून द्यायची आहे, ज्याने जागतिक पातळीवर भारताचं नाव उंचावलं. प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा अशा व्यक्तीमत्वाची ओळख या चित्रपटाद्वारे जगाला व्हावी असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.’
जिओ स्टुडिओ प्रस्तुत, आटपाट निर्मित, नागराज पोपटराव मंजुळे दिग्दर्शित ‘खाशाबा’ या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि नागराज मंजुळे यांनी केली असून लवकरच सिनेमाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. दरम्यान, नुकताच नागराज यांचा घर बंदुक बिरयानी सिनेमा चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.