५ एप्रिल २०२१,
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज(सोमवार) गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला चौकशीचे आदेश दिले असून, १५ दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्याच्या गृहमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर याबाबत निर्णय झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात राज्यपालांना देखील कळवलं आहे.
तर, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा कार्यभार आता हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्याची इच्छा होती. मात्र, दिलीप वळसे-पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडे हे पद देण्यात आलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद आलं आहे.