पाणीपुरवठा विभागाच्या देखभालीच्या कामाची कार्यरंभ आदेशाची (वर्क ऑर्डर) फाईल तयार करण्यासाठी एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेला अनुरेखक दिलीप आडे याला महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच आडे याची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा व जलनिःसारण विभागात दिलीप भावसिंग आडे हा अनुरेखक (लिपिक) या पदावर काम करत होता. आडे याने एका ठेकेदाराला मंजूर निविदेच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यासाठी एक लाख पाच हजार रूपयांची लाच मागितली. तडजोडीअंती एक लाखांची रोकड घेताना आडेला २१ मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालिकेत रंगेहाथ पकडले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवारी आडेला पालिका सेवेतून निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत. या आदेशाची आडेच्या सेवा नोंद पुस्तकात नोंदही करावी, असेही आदेशात म्हटले आहे.