पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत शहरातील विविध विकासकामे आणि विभागीय खर्चाशी संबंधित महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते.
या बैठकीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सदस्य, अतिरिक्त आयुक्त तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता आणि सार्वजनिक सेवांशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा दुसरा हप्ता देण्यासाठी 2025-26 सालच्या संचलन तुटीपोटी आगाऊ निधी देण्यास मंजुरी देण्यात आली.
चिखली येथे 5 दशलक्ष लिटर क्षमतेच्या अल्ट्राफिल्ट्रेशन प्लांटमधून प्रक्रिया केलेले सांडपाणी पुरवठा प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली. सायकलिंग व शाश्वत वाहतूक उपक्रमांसाठी जनजागृती व सल्लागार नेमणुकीसाठी मिळालेल्या अनुदानातून खर्च करण्यासही मान्यता देण्यात आली.
तसेच बालाजीनगर (प्रभाग ८) आणि शांतीनगर (प्रभाग ७) येथील जीर्ण सामुदायिक शौचालये पाडून नवीन सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय जलतरण तलाव भाडेतत्त्वावर देणे, महापालिका रुग्णालयांमध्ये कंत्राटी कर्मचारी नेमणूक, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसाठी कर्मचारी संख्या वाढविणे, लॅपटॉप खरेदी आणि फॉगिंगसाठी वाहने भाड्याने घेणे अशा विविध विषयांनाही मंजुरी देण्यात आली.
या निर्णयांमुळे शहरातील मूलभूत सुविधा अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.


