रेड झोन संरक्षण क्षेत्रात मोडणाऱ्या भूखंडांवर राज्य सरकारने खरेदी-विक्री व्यवहारांवर बंदी घातलेली असतानाही तळवडे व परिसरात खुलेआम भूमी व्यवहार सुरू आहेत. काही एजंट्सनी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून बनावट किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे खरेदी-विक्री व्यवहार करत कामगार वर्गातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात आहे.
हे प्रकार तळवडे, रुपी नगर, टॉवर लाईन, चिखली, साने चौक, मोरे वस्ती, पाटील नगर, देहू गाव, चव्हाण वस्ती आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. संबंधित भूखंड हे रेड झोन संरक्षण क्षेत्रात बाधित असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या जागांवर स्पष्ट बंदी आदेश जारी केला आहे. तरीही एजंट व बिल्डर मिळून नागरिकांकडून आर्थिक रक्कम घेऊन बेकायदेशीररित्या मालमत्ता नोंदणी करत आहेत.
विशेष म्हणजे, सातबारा उतारा नोंदणीसाठी किमान ११ गुंठे भूखंडाची अट असताना, १-२ गुंठ्यांच्या जागा देखील पैसे घेऊन नोंदवल्या जात आहेत. यामध्ये महानगरपालिकेतील काही करसंकलन अधिकारी, स्थानिक एजंट व राजकीय पाठबळ असलेले बिल्डर सामील असल्याची शक्यता आहे. परिणामी, सामान्य नागरिकांचा आर्थिक आणि मानसिक छळ होत आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
रेड झोन क्षेत्रात असलेल्या जागांवर खरेदी-विक्री व्यवहार बंदी असूनही व्यवहार सुरू
एक ते दोन गुंठ्यांच्या जागांची नोंदणी नियमबाह्य पद्धतीने सुरू
कामगार वर्गाला लक्ष करून फसवणूक
स्थानिक एजंट व गावगुंडांची सक्रियता
करसंकलन अधिकारी, दुय्यम निबंधक कार्यालय आणि बिल्डर यांचा संभाव्य संगनमत
राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
तळवडे, चिखली, दिघी, बोपखेल, यमुना नगर, त्रिवेणी नगर या भागातील जमीन व्यवहारांची तातडीने चौकशी करण्यात यावी, एजंट व बिल्डर यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि नागरिकांच्या मालमत्तेची व नोंदणीची रद्द केली जावी, अशी मागणी होत आहे.