Monday, October 12, 2026
Homeअर्थविश्वदापोडीतील शून्य कचरा प्रकल्पाला उपमहापौर शर्मिला बाबर यांची भेट

दापोडीतील शून्य कचरा प्रकल्पाला उपमहापौर शर्मिला बाबर यांची भेट

महिला बचत गटाच्या माध्यमातून कचऱ्याचे व्यवस्थापन; महिलांना रोजगारासह परिसर स्वच्छतेला चालना

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि वैष्णवी महिला बचत गटाच्या माध्यमातून दापोडी येथे राबविण्यात येत असलेल्या शून्य कचरा प्रकल्पाला उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची संपूर्ण कार्यपद्धती आणि कचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया जाणून घेतली. तसेच प्रकल्पात कार्यरत महिलांशी संवाद साधून त्यांच्या कामकाजाची माहिती घेत त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.

यावेळी सहाय्यक आरोग्य निरीक्षक राजेश भाट, अंकुश झिटे, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक ओंकार शिवरकर, प्रभारी आरोग्य निरीक्षक उमेश जाधव, समाज विकास विभागाच्या समूह संघटिका वैशाली लगडे, योजक संस्थेच्या सिनिअर मॅनेजर सेजल जोशी यांच्यासह प्रकल्पात कार्यरत महिला उपस्थित होत्या.

महानगरपालिकेच्या समाज विकास विभाग, आरोग्य विभाग आणि पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वैष्णवी महिला बचत गटातील सात महिला या प्रकल्पाचे कामकाज सांभाळत आहेत. या माध्यमातून कचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याबरोबरच महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

या प्रकल्पामध्ये संकलित केलेल्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते. तसेच प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बेंच, पेव्हिंग ब्लॉक यांसारख्या विविध उपयुक्त वस्तू तयार करण्यात येतात. त्यामुळे कचऱ्याचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मितीला चालना मिळत असून परिसरातील स्वच्छताही राखली जात आहे.

शून्य कचरा प्रकल्पामुळे परिसरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असून कचरा वाहतूक करून मोशी येथील कचरा डेपोवर टाकण्याचा भारही कमी होतो. स्थानिक पातळीवरच कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याने कचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक होण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर या उपक्रमातून बचत गटातील महिलांना नियमित रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळत असून त्यांच्या आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल होत आहे.

कचरा व्यवस्थापनासोबतच महिला सक्षमीकरणाचा प्रभावी नमुना म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे. कचऱ्यापासून उपयुक्त वस्तू तयार करून त्यातून उत्पन्न मिळविणाऱ्या या महिला परिसरातील इतर नागरिक आणि महिला बचत गटांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिला आर्थिक सक्षमीकरण या तिन्ही बाबींचा समन्वय या प्रकल्पातून साधला जात आहे.

दापोडी येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला शून्य कचरा प्रकल्प हा स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाचा सुंदर संगम आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून त्यापासून खत तसेच विविध उपयुक्त वस्तू तयार केल्या जात आहेत. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होत असून महिलांना रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. आपल्या मेहनतीतून आणि कल्पकतेतून या महिला समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करत आहेत. अशा उपक्रमांना प्रोत्साहन देऊन त्यांचा विस्तार करण्यासाठी महानगरपालिका स्तरावर आवश्यक सहकार्य करण्यात येईल. – शर्मिला बाबर, उपमहापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments