Monday, July 14, 2025
Homeताजी बातमीजिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे कामगार उपायुक्तांचे निर्देश

जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे कामगार उपायुक्तांचे निर्देश

उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत पुणे जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी येत्या १३ मे रोजी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश पुणे विभागाचे कामगार उपायुक्त अभय गीते यांनी दिले आहेत.

सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने उदा. खाजगी कंपन्यामधील आस्थापना, दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, खरेदी केंद्रे , मॉल्स, किरकोळ विक्रेते आदी ठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी किंवा अपवादात्मक परिस्थितीत त्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास त्याठिकाणी दोन ते तीन तासांची सवलत देण्यात यावी. सवलत देण्यापूर्वी संबंधित महानगरपालिका अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घ्यावी. याबाबत उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडील शासन परिपत्रकातील निर्देशाचे तंतोतंत पालन होईल, याबाबत दक्षता घ्यावी.

काही व्यवस्थापनाकडून कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी न देता एक दिवसाचे जादा काम करण्याच्या तोंडी सूचना दिल्या असल्याबाबत वृत्तपत्रातून निदर्शनास आले आहे. त्यामुळे या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच मतदानासाठी दिलेल्या सुट्टीची भरपाई करून घेऊ नये.

संबंधित आस्थापनेतील अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्याकडून मतदानाकरीता भरपगारी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याची तक्रार कामगार कार्यालयास प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनेविरुद्ध भारत निवडणूक आयोग तसेच शासनाने विहित केलेल्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

निवडणूकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास संबंधितांनी अपर कामगार आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग, कामगार उप आयुक्त यांचे कार्यालय, पुणे जिल्हा adclpune5@gmail.com किंवा dyclpune2021@gmail.com या ई-मेल पत्त्यावर किंवा विभागाचे अधीक्षक चि. भि. केंगले, यांच्या भ्रमणध्वनी क्र. ८७९६६७५०८९ वर तक्रार दाखल करावी, असे आवाहन कामगार उपायुक्त श्री. गीते यांनी केले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments