२२ ऑक्टोबर २०२०,
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त खबरदारी घेताना पाहिले आहे. पण, आता अजित पवार यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांना सौम्य लक्षणं असून मुंबईमधील घरात ते क्वारंटाइन झाले आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या सर्व बैठका तसंच सकाळी होणारा जनता दरबार रद्द करण्यात आला होता. यावेळी कोणतंही कारण सांगण्यात आलं नव्हतं.

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी अजित पवार पक्ष कार्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत असं सांगितंल होतं. राष्ट्रवादीकडून ट्विट करत अजित पवार पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आज सकाळी उपलब्ध राहू शकणार नाहीत अशी माहिती देण्यात आली होती. अजित पवारांनी हे ट्विट रिट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये सांगण्यात आलं होतं की, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काही अपरिहार्य कारणास्तव गुरूवार, २२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी”.