Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपुजन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपुजन

स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि कलाक्षेत्रातही भरीव योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध विकासप्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण, भूमिपुजन श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांच्या अनुषंगाने सांगवी येथील सार्वजनिक बांधकाम मैदान (पी. डब्लू. डी. मैदान) येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या उद्घाटन समारंभास आमदार आण्णा बनसोडे, उमा खापरे, अश्विनी जगताप, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसदस्य बाळासाहेब लांडगे, जगदीश शेट्टी, अजित गव्हाणे, नाना काटे, संदीप चिंचवडे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, शाम लांडे, राजू मिसाळ, अमित गावडे, मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र जगताप, कैलास बारणे, सतीश दरेकर, संजय वाबळे, पंकज भालेकर, मयुर कलाटे, शांताराम भालेकर, विनायक रनसुबे, डब्बू आसवाणी, माजी नगरसदस्या सीमा साळवे, शर्मिला बाबर, सुषमा तनपुरे, आशा शेडगे, स्वाती कलाटे, माया बारणे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, पोलीस उपआयुक्त वसंत परदेशी, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य अभियंता रामदास तांबे, श्रीकांत सवणे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, उपआयुक्त मिनीनाथ दंडवते, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, अमित पंडित, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड या औद्यगिक नगरीची लोकसंख्या लक्षात घेऊन शहराच्या सर्वांगिण विकासासाठी अधिकच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाईल. नागरिकांचे जीवनमान उंचवावे यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना तसेच उपक्रम राबविले जात आहेत. त्यादृष्टीने विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले असून शहराच्या विकासासोबत रोजगाराच्या संधीदेखील वाढत आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधा लक्षात घेता त्यासाठी सक्षम आणि अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी ३५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यासोबतच पिंपरी चिंचवड शहराची २०३२ पर्यंतची लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन शासनाकडून करण्यात येणार आहे, असे श्री पवार यांनी यावेळी सांगितले.

देश जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या काही पाऊले मागे आहे. सध्या देशात वंदे भारत रेल्वे, विमानतळांचे विस्तारीकरण, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आदी विकासकामे वेगाने सुरू आहेत. तसेच शासनामार्फत विकसित भारत संकल्प यात्रा यांसारखे विविध उपक्रम राबवून विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ नागरिकांना होत असून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे, असे श्री पवार म्हणाले.

महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे २४,००० चौरस फुट क्षेत्रफळ असलेली दिव्यांगासाठी कल्याणकारी केंद्राची इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. चार मजल्याच्या या इमारतीमध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या केंद्रामध्ये बौद्धिक अपंगत्व, अंधत्व, शिकण्याची अक्षमता, मानसिक आजार, कुष्ठरोग, श्रवणदोष, कमी दृष्टी, सेरेब्रल पाल्सी, बौनेत्व, स्नायू डीस्ट्रोफी, बहिरे अंधत्व, भाषण आणि भाषा कमजोरी, ऑटीझम सेप्ट्रम डीसऑर्डर, एकाधिक अपंगत्व आणि विकासात्मक विलंब अशा दिव्यांग व्यक्तींवर थेरपी उपचार करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे. तसेच समुपदेशन कक्ष, म्युझिक थेरपी, हायड्रोथेरपी, भाषा आणि गणित प्रयोगशाळा, अपंग तरूणांना रोजगारासाठी विशेष प्रशिक्षण व्यवस्था, वाचनालय, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शहरात सर्व दिव्यांग व्यक्तींसाठी मध्यवर्ती केंद्र म्हणून दिव्यांग भवन महत्वाचे ठरणार असून दिव्यांगांसाठीच्या सर्व प्रकारच्या उपचार थेरपी एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे हे भारतातील पहिले केंद्र असेल. या केंद्राचे संचालन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशन अशी कंपनी स्थापन करण्यात आली आहे.

सांगवी येथे बांधण्यात आलेल्या तलावाचे आधुनिक पद्धतीने नुतनीकरण करण्यात आले असून या तलावाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

वाकड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ५ हजार १९० चौरस मीटर क्षेत्रात ८ बॅडमिंटन कोर्ट बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपुजन उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यांत्रिकी पद्धतीने रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सांगवी येथे करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरामधील बी.आर.टी.एस रोड, महामार्ग तसेच १८ मीटरपेक्षा जास्त रुंदी असणारे रस्ते, पदपथ तसेच सेवा रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीचा वापर केला जाणार आहे. सात वर्षांकरिता या प्रकल्पासाठी सुमारे ३२८.९५ कोटी रुपये खर्च होणार आहे. यासाठी चार पॅकेज निश्चित करण्यात आले असून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या दक्षिण बाजूस दोन पॅकेज आणि उत्तर बाजूस २ पॅकेच अशा समान पद्धतीने विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक पॅकेजमध्ये एकूण ११ वाहने असून त्यात २ हेवी रोड स्वीपर, २ मिडीयम रोड स्वीपर, ४ गॉब्लर पिकर, २ हुक लोडर आणि पाण्याच्या टँकरचा समावेश आहे. वाहनांचे संचालन आणि साफसफाई कामकाजाकरिता २२० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक रोड स्वीपर वाहनाद्वारे दररोज ४० किलोमीटर रस्त्यांची साफसफाई करण्यात येणार असून साधारणपणे दररोज ६४० किलोमीटर अंतराची झाडलोट केली जाणार आहे. यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचा अवलंब केल्याने शहरातील स्वच्छतेचे कामकाज गतिमान आणि प्रभावीपणे होणार आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेचे गुणांकन देखील वाढण्यास मदत होणार आहे.

कासारवाडी व गवळीमाथा येथे सुमारे ८.९६ कोटी रुपये खर्च करून घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्र तसेच काळेवाडी येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे १८.६५ कोटी रुपये खर्च करून ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात आले आहे. या केंद्राचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे सन २०१९ मध्ये पदव्युत्तर संस्था स्थापन झाली. यामध्ये एम.डी, एम.एस पदव्युत्तर पदवीचे एकूण १३ विविध विषयांमध्ये दरवर्षी ४९ विद्यार्थी प्रवेश घेतात. सध्या या संस्थेमध्ये १२९ पदव्युत्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष तज्ञ अध्यापक वर्ग व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे वायसीएम रुग्णालयातील रुग्णांना गुणवत्तापुर्वक उपचार दिले जात आहे. वायसीएम रुग्णालयाच्या आवारामध्ये नव्याने ११ मजली इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

जुन्या पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी पुणे नाशिक महामार्ग, जुना मुंबई पुणे रस्ता, पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग या रस्त्यांना जोडणारा ९० मीटर स्पाईन रस्ता व ४५ मीटर रुंद डी. पी. रस्ता बनविण्यात आला आहे. भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक- किवळे या ४५ मीटर रस्त्यावर निसर्गदर्शन सोसायटीजवळ रेल्वे लाईनवर सुमारे ८५ कोटी ८३ लाख रुपये खर्च करून उड्डाणपुल उभारण्यात आला आहे. या पुलाचा लोकार्पण सोहळा देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments