Saturday, November 8, 2025
Homeताजी बातमीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण तसेच भूमिपुजन संपन्न..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन, लोकार्पण तसेच भूमिपुजन संपन्न..

औद्योगिक नगरीसह कष्टकऱ्यांची नगरी, कामगारांची नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने विकास होत असून इथल्या प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. असे असले तरी शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि मुलभूत सेवा देण्यासाठी महापालिका अविरतपणे काम करत आहे. हे शहर येणाऱ्या प्रत्येकाला आधार देत असून रोजगार देखील देत आहे. नागरिकांच्या आशा आकांक्षांना मुर्त रूप देणारे पिंपरी चिंचवड शहर देखील मुंबईपाठोपाठ ‘सिटी ऑफ होप’ झाले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध विकासप्रकल्पांचे ई- उद्घाटन, लोकार्पण तसेच प्रस्तावित प्रकल्पांचे भूमिपुजन अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमांच्या अनुषंगाने पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदीर येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या उद्घाटन समारंभास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार आण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, माई ढोरे, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह माजी नगरसदस्य तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी, महापालिका आणि सिंबायोसिस स्कील ऍन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमातील विद्यार्थी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि महापालिका अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिकदृष्ट्या विकास करण्यावर भर –

मागील वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन यशस्वीरित्या याठिकाणी पार पडले. त्यानिमित्ताने कलाकारांची मोठी मांदियाळी या शहरात जमली होती. ही शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे. तसेच काही वर्षांपुर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही यशस्वी आयोजन पिंपरी चिंचवड शहरात करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा अधिक वृद्धिंगत करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पिंपरी चिंचवड शहराचा सांस्कृतिकदृष्ट्या विकास करण्यावर भर देण्याकडे महापालिकेने लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी सूचना श्री. पवार यांनी केली.

शहरातील नागरिकांना दर्जेदार सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध –

चौहोबाजूंनी वाढणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक होणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा दर्जेदार असाव्यात यासाठी विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत. शहराचा विकास नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पादचारी मार्ग, सायकल मार्ग, वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी भुयारी मार्ग तसेच पुलांची उभारणी करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा वाढविण्यावरही भर दिला जात आहे जेणेकरून खासगी वाहतुकीचा वापर कमी होऊन रहदारी कमी होण्यास मदत होईल. विविध विकासकामे राबविताना महापालिकेने विकासाची गती चांगली ठेवली आहे. हा प्रवास करताना लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घ्यावे असे देखील श्री. पवार म्हणाले.

शहरवासियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर उपयुक्त –

स्मार्ट सिटी लिमिटेडच्या माध्यमातून महापालिकेने शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे प्रत्येक भाग हा सीसीटीव्ही यंत्रणेच्या कक्षेत येत असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या यंत्रणेचा उपयोग इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला होत आहे. महिलांची छेडछाड, चोरी असा प्रकारचे गुन्हे रोखण्यास त्यामुळे मदत होईल. शिवाय इतर अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून हे सेंटर बनविले असल्यामुळे व्यापक दृष्टीनेही ते नागरी हिताचे आहे, असे श्री. पवार म्हणाले.

कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे महिला सक्षमीकरणास चालना –

पिंपरी चिंचवड महापालिका व सिंबायोसीस स्कील प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विदयमाने विविध रोजगाराभिमुख कोर्सेसचे प्रशिक्षण महिलांना दिले जात आहे. या महत्वाकांक्षी उपक्रमामुळे त्यांना भविष्यात रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर येण्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचेही योगदान –

विविध प्रकारच्या करातून महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीत निधी जमा होत असतो. यामध्ये निधीमध्ये पिंपरी चिंचवड शहराचाही वाटा आहे. त्यामुळे औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहराचे राज्याच्या विकासातही महत्वाचे योगदान असल्याचेही श्री. पवार यावेळी म्हणाले. पिंपरी चिंचवड शहर राज्याचे ग्रोथ इंजिन असून येथील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प –

मुळा नदीकाठ सुधार प्रकल्पाचा टप्पा 1 चा शुभारंभ होत असताना नदीच्या एका बाजूला पिंपरी चिंचवड आणि दुसऱ्या बाजूला पुणे महानगरपालिका असल्याने पुणे महानगरपालिकेलाही त्याचवेळी निविदा करण्यास सांगितले असल्याने दोन्ही कामे एकाच वेळी होऊन चांगले काम होईल, असेही श्री. पवार म्हणाले.

चुकीचे प्रकार, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही-

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत. या शहरात माय माता, मुली, बहिनी सुरक्षित रहाव्यात, चोऱ्या माऱ्या होऊ नयेत यासाठी शहरात सीसीटिव्हीची नजर आहे. कोणतेही चुकीचे प्रकार, दहशत, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. मुली, स्त्रियांनी देखील काळजी घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी माता भगिनींची सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. त्यानुसार काम व्हावे, असेही ते म्हणाले.

माता रमाईंचा पुतळा उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही-

पिंपरी चिंचवड येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे असलेल्या पीएमपीएमएलच्या जागेत माता रमाईंचा पुतळा उभा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात आयुक्त शेखर सिंह म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरवासियांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी महापालिका नेहमीच प्रयत्नशील असते. शहरातील सर्व घटकांचा सर्वांगीण विचार करून महापालिकेने अनेक प्रकल्पांची उभारणी केली असून विकास प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपुजनाचा ऐतिहासिक सोहळा आज संपन्न होत आहे. यामध्ये शहरातील आजी माजी लोकप्रतिनिधी, विविध संस्था, संघटना आणि नागरिकांचा महत्वाचा सहभाग असून यापुढेही हे सहकार्य असेच राहील अशी अशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बोपखेल येथे मुळा नदीवरील पुल-

महापालिकेच्या वतीने बोपखेल येथे मुळा नदीवर उभारण्यात आलेल्या शहरातील १८५६ मीटर लांबीच्या या पुलामुळे नागरिकांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. तसेच नागरिकांचा सुमारे १० ते १५ किलोमीटरचा प्रवास कमी होणार असून शहरातील इतर महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदतही होणार आहे.

सांगवी बोपोडी येथे मुळा नदीवरील पुल-

शहरातील दळणवळण आणि आणि नागरिकांचा प्रवास जलदगतीने व सुरक्षितपणे होण्यासाठी सांगवी बोपोडी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. सुलभ वाहतुकीसह पर्यावरण समतोल देखील यामुळे साधला जाणार आहे. सांगवी ते बोपोडी हे अंतर अतिशय कमी वेळेत पार करणे शक्य होणार असून औंध ते रावेत रस्ता व पुणे ते मुंबई रस्ता यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास देखील मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४१.६१ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी, इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर –

महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत निगडी येथे इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, स्मार्ट पर्यावरण व्यवस्थापन, स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन, स्मार्ट वॉटर आदींचे व्यवस्थापन, समन्वय, सहयोग व निरीक्षण आदी बाबींचे नियंत्रण करणे शक्य होणार आहे. त्यासाठी स्मार्ट ट्रॅफिक अंतर्गत १२१० कॅमेऱ्यांद्वारे रस्त्यावरील ट्राफिक सिग्नलचे होणारे उल्लंघन, झेब्रा क्रॉसिंग किंवा स्टॉप लाईन डिटेक्शन, गतीचे उल्लंघन, चुकीच्या दिशेने वाहनांची होणारी वाहतुक, ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोनचा वापर यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने त्याचा वापर करता येणार आहे. तसेच शहरातील पाण्याचे, घनकचरा व्यवस्थापनाचे, वाहतूक कोंडीचे निरीक्षण व नियंत्रण यामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे४४१ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आकुर्डी आणि पिंपरी येथे निवासी सदनिका –

शहरात स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परवडणाऱ्या दरात आकुर्डी येथे ५६८ तर पिंपरी येथे ३७० निवासी सदनिका बांधण्यात आल्या आहेत. या प्रकल्पामध्ये लिफ्ट, सोलर सिमाभिंत, अंतर्गत रस्ते, पथदिवे, पावसाळी नलिका, रेनवॉटर हार्वेस्टिंग, पाणीपुरवठा, जलनि:सारण, ट्रान्सफॉर्मर, सेंद्रिय खत प्रक्रिया, मैलाशुद्धीकरण केंद्र, सांस्कृतिक हॉल, व्यापारी गाळे आदी सुविधा पुरविण्यात आल्या असल्याची माहिती आयुक्त सिंह यांनी यावेळी दिली.

फुड कोर्ट (खाद्य पदार्थ केंद्र)

सुमारे ४.१७ कोटी रुपये खर्च करून आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील परिसरात फूड कोर्ट उभारण्यात आले आहे. या फुड कोर्टमुळे अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे शहरतील पदपथांवरील अतिक्रमण कमी होण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.

भोसरी सहल केंद्र, केशवनगर, चिंचवड आणि वाल्हेकरवाडी येथील नवीन मैलाशुद्धीकरण केंद्र-

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील मैलाशुद्धीकरण केंद्राचे विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच विविध भागातून जमा होणाऱ्या मैला पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने भोसरी सहल केंद्र, चिंचवड येथील केशवनगर आणि वाल्हेकरवाडी येथे मैलाशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रांमुळे सद्यस्थितीत असलेले मैलापाण्याचे दुबार पंपिंग थांबणार असून त्यामुळे वीज बचत आणि शहरातील इतर मैलाशुद्धीकरण केंद्रांवरचा ताण कमी होणार आहे. तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर उद्यानातील वापरासाठी, बांधकामांसाठी, रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यासाठी करण्यात येणार असून यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नद्यांचे प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार असल्याची माहिती आयुक्त सिंह यांनी दिली.

इंद्रायणीनगर आणि जाधववाडी येथील उद्यान –

इंद्रायणीनगर येथे प्रभाग क्र. ८ मध्ये निर्भयाच्या संकल्पनेवर आधारित आकर्षक उद्यान बनविण्यात आले आहे. या भव्य उद्यानामध्ये ३५ फुट उंचीचा निर्भयाचा पुतळा देखील उभारण्यात आला आहे. त्यातून महिलांप्रती आदर व सन्मानाची भावना निर्माण होईल तसेच महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. या उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे. यासाठी सुमारे ७.८१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जाधववाडी उद्यानामध्ये ५७० मीटरचा जॉगिंग ट्रॅक, १५ X १५ मीटरचे मेडिटेशन सेंटर, कॅफेटेरिया आदी उभारण्यात आले आहे. यासाठी सुमारे ११.६५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे आयुक्त सिंह म्हणाले.

स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन-

पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी हे भव्य कामगार भवन उभारण्यात आले आहे. कामगारांसाठी कामगार हिताचे बहुउद्देशीय उपक्रम राबविण्यासाठी हे भवन उपयुक्त ठरणार आहे. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या वर्गणीतून हे भवन उभारण्यात आले असून अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सांघिक भावनेचे हे प्रतिक असल्याचे आयुक्त सिंह म्हणाले.

पिंपळे सौदागर येथील पवना नदीवरील पूल व रस्त्याचे काम-

१२.३१ कोटी रुपये खर्च करून पिंपळे सौदागर येथे पवना नदीवर १०० मीटर लांबीचा पूल उभारण्यात आला आहे. पिंपरी आणि पिंपळे सौदागर यांना जोडण्यात सुलभता येणार आहे. पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते गोविंद गार्डन चौकापर्यंतच्या रस्त्याचा अद्ययावत पद्धतीने विकास करण्यात येणार असून यासाठी सुमारे ४२.१० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत.

हरित सेतू प्रकल्प-

हरित सेतू प्रकल्पाअंतर्गत निगडी येथे सुमारे २० किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. यामध्ये पादचारी मार्ग, पदपथ रूंदी, सायकल मार्ग, समांतर वाहनतळ अशा सुविधांचा समावेश असणार आहे. अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट नागरिकांसाठी आरोग्यपूर्ण, स्वच्छतापुर्ण आणि पर्यावरणपूरक वातावरण तयार करणे तसेच शहराची पर्यावरणीय गुणवत्ता वाढून त्याचा लाभ शहरवासियांना व्हावा हा उद्देश असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे भुयारी मार्ग-

सांगवी-किवळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे २६.४० मीटर रुंदीच्या भुयारी मार्गाची बांधणी करण्यात येणार आहे.यासाठी सुमारे २३.७५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प-

सुमारे ३२० कोटी रुपये खर्चकरून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये मुळा नदीकाठची १२ किलोमीटर परिसरासाठी मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प राबविण्यात आला आहे. मुळा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच जैवविविधता अबाधित राहण्यासाठी, नदीच्या पाण्याचे सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे, घनकचरा काढणे आणि नदीकाठावर पर्यावरणपूरक उपाययोजना राबविणे, आकर्षक लॅन्डस्केपिंग करून सुशोभीकरण करणे, नदीकाठचा विकास आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून करणे हा या प्रकल्पामागचा उद्देश असल्याचेही आयुक्त सिंह म्हणाले.

बायोडायव्हर्सिटी पार्क-

तळवडे येथील सुमारे ६० एकर जागेत बायोडायव्हर्सिटी पार्क उभारण्यात येणार आहे. जैवविविधतेचे संवर्धन करणे, शहरीकरण विस्ताराबरोबर वन्य परिसराचे संवर्धन करणे, वन्य पशु पक्षांचे संवर्धन करणे, जैवविविधतेसंबंधी शिक्षण देणे आदी संकल्पनांचा यामध्ये समावेश असणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७४ कोटी ५३ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सिंह यांनी दिली.

वाकड, पुनावळे , ताथवडे, पिंपळे सौदागर परिसरातील रस्त्यांचे भूमिपूजन-

वाकड येथील टिपटॉप हॉटेल पासून अटलांटा २ सोसायटीकडे जाणारा १८ मीटर रुंद डी.पी रस्ता, पुनावळे येथील गायकवाडनगर मधील १८ मीटर रुंद डी.पी. रस्ता, पुनावळे गावठाणातून जाणारा १८ मीटर रस्ता, ताथवडे गावातून जिवननगरमार्गे MTU कंपनीकडे जाणारा १८ मीटर डी.पी रस्ता, पुनावळे येथील कोयतेवस्ती चौक ते जांबे गावाकडे जाणारा १८ मीटर डी.पी रस्ता, पुनावळे येथील मुंबई-बंगळुरू हायवे पासून काटेवस्तीकडे जाणाऱ्या ३० मीटर डी.पी रस्ता, पिंपळे सौदागर येथे नॅचरल आईस्क्रिम स्टोअर ते ट्रॉईज सोसायटी पर्यंतचा रस्ता विकसित करण्यात येणार असून यासाठी सुमारे १६०.९९ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. यामुळे शहरातील रस्त्याचे सुसूत्रीकरण व वाहतूक नियोजन सुयोग्य होणार असल्याचे मत आयुक्त सिंह यांनी व्यक्त केले आहे.

निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून मुंबई-पुणे हायवेलगत दापोडी पर्यंत जलवाहिनी-

निगडी सेक्टर क्र. २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत दापोडी पर्यंत १००० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यामुळे सांगवी, दापोडी भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.यासाठी सुमारे ५७ कोटी ८१ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सिंह यांनी दिली.

शहरात टाकाऊ वस्तूंपासून वर्ल्ड पार्क तसेच बॉलीवूड पार्क उभारणे –

पिंपरी चिंचवड शहरात सुमारे २१ कोटी ६९ लाख रुपये खर्च करून विविध ठिकाणी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ कलाकृतींची (वेस्ट टू वंडर) निर्मिती करून वर्ल्ड पार्क आणि बॉलीवूड पार्क विकसित करण्यात येणार आहे. ‘रिड्यूस, रियुज अँड रिसायकल या तत्वावर आधारित टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून हे पार्क विकसित करण्यात येणार असून विकासकामांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून नागरिकांचे जीवनमान उंचावणार असल्याचेही आयुक्त सिंह म्हणाले.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आकुर्डी व पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या सदनिकांच्या लाभार्थ्यांना श्री. अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ताबा वाटप करण्यात आले. त्यामध्ये अर्चना गनगर्डे, वैभवी मोहिते, पोपट कुसळे, योगेश कोळी, रोहिनी पाटील, अविनाश भोसले, चेतना सातुर्डेकर, ऋतुजा गायकवाड, संजय धंगापुरे, वंदना कोंढावळे, विशाल भालेराव, संजय अंकुश या लाभार्थ्यांचा समावेश होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सिंबायोसिस स्कील ऍन्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सिलंस डिप्लोमा कोर्सचे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या तसेच नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपही यावेळी करण्यात आले. त्यामध्ये समिक्षा रंगोजी, अमृता हुनाळे, सिद्धी कोतवाल आकांक्षा वांदेकर, सिद्धी जगताप आणि हुदा खान या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रकल्पांची माहिती असलेली आणि आयसीसीसी प्रकल्पाच्या माहितींच्या चित्रफीती दाखविण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त शेखर सिंह यांनी केले, आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले तर सुत्रसंचालन विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

तत्पुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काही विकासकामांचे लोकार्पण, उद्घाटन, भूमिपुजन प्रत्यक्षस्थळी संपन्न झाले. त्यामध्ये बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलाचे लोकार्पण, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने स्थायी आदेश पुस्तिकेचे प्रकाशन, स्मार्ट सिटी अंतर्गत निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरचे लोकार्पण, निगडी प्राधिकरण येथील हरित सेतू विषयक कामांचे भूमिपुजन, पिंपरी ते पिंपळे सौदागर दरम्यान पवना नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण, सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर सबवे बांधण्याच्या कामाचे भूमिपुजन, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महापालिका यांच्या वतीने संयुक्तरित्या राबविण्यात येणाऱ्या मुळा नदीकाठ सुधारणा प्रकल्प (टप्पा १) कामाचे भूमिपुजन तसेच सांगवी-बोपोडी दरम्यान मुळा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण या प्रकल्पांचा समावेश होता.

यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, माजी महापौर आर. एस. कुमार, योगेश बहल, मंगला कदम, माई ढोरे, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, तसेच माजी नगरसदस्य आणि महापालिका अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments