अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत देशात डिमॅट खात्यांची संख्या दुप्पट झाली आहे. 2018-19 पर्यंत देशात 3.6 कोटी डिमॅट खाती होती, सरत्या वर्षांत नोव्हेंबर 2021 मध्ये ही संख्या 7.4 कोटींपर्यंत पोहचली आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते अत्यावश्यक आहे. बँकेत गुंतवणुकीसाठी आणि बचतीसाठी जसे बँक खाते असते, तसेच शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी डीमॅट महत्वाचे असते. नवीन आकडेवारी भारतीय गुंतवणुकदारांना थक्क करणारी आहे. या आकडेवारीनुसार, गेल्या 20 वर्षांत उघडण्यात आलेल्या डिमॅट खात्यांपेक्षा या तीन वर्षांत सर्वाधिक डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. सरकार ही या आकड्यांमुळे आश्चर्यचकित झाले आहे. कोविड काळात डिमॅट अकाऊंटची आणि डिजिटल पेमेंटची समांतर लाट देशात दिसून आली. कोरोनात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी अनेकजण एक हात मारायला काय हरकत आहे ? अशा विचाराने शेअर मार्केटकडे वळत आहेत. तर अल्पबचत योजनांचे व्याजदर कमी झाल्याने काहींना अभ्यास करुन चांगला परतावा घ्यायचा आहे. त्यासाठी धोका पत्करण्याची तयारी ही गुंतवणुकदारांनी ठेवली आहे.
भारतीय शेअर मार्केटवर कोरोना लाटेचा म्हणावा तितकडा परिणाम झालेला नाही. मार्केट अनेकदा तेजीत दिसून आले आहे. कोरोना शेअर मार्केटसाठी इष्टापती ठरले आहे. तेजीचा फायदा घेण्यासाठी आणि कोरोना काळात झालेला तोटा भरुन काढण्यासाठी देशातील लाखो गुंतवणुकदारांनी शेअर मार्केटकडे मोर्चा वळविला आहे.
गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर 2021 दरम्यान 1.9 कोटी खाती उघडण्यात आली. म्हणजे दरमहिन्याला 26.7 दशलक्ष खाती उघडण्यात आली. या काळात सेन्सेक्सने 48 हजार ते 62 हजारांचा टप्पा गाठला. हा मैलाचा दगड होता. कोविड लाटेसोबतच शेअर बाजारातील तेजीने ही उच्चांक गाठला. विशेष बाब म्हणजे देशात या तीन वर्षात उघडण्यात आलेल्या डिमॅट खात्यांमध्ये 3/4 खाती ही नव्या पिढीची आहे. 30 वर्षांखालील तरुणांनी ही खाती उघडली आहेत. शेअर बाजारातील तेजीने गुंतवणुकदारांना विशेष आकर्षित केले आहे. देशात ताळेबंदी असताना लोक दिवसभर घरात होते. त्यावेळी युट्युब आणि इतर ठिकाणी शेअर मार्केट व्हिडिओचे ही अमाप पिक आले आणि या लाटेत अनेकांनी आपल्या गुंतवणुकीच्या होड्या सोडल्या.
धडाधड डिमॅट अकाऊंट उघडण्यात आले असले आणि गुंतवणुकदारांनी त्यांचा मोर्चा बाजारपेठेकडे वळविला असला तरी तज्ज्ञ या बदलावर आनंद व्यक्त करताना हा आकडा अत्यंत तोकडा असल्याचे सांगत आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे इक्विटी रिसर्चचे तांत्रिक विश्लेषक चंदन तापडिया यांनी ललनटॉप या वेबसाईटशी बोलताना सांगितले की, 138 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या देशात, शेअर बाजारात केवळ 1.2 कोटी लोक गुंतवणूक करतात. आर्थिक साक्षरता जसजशी वाढत जाईल, तसतसे डेमॅट खात्यांची संख्या ही वाढेल, अशी पुश्ती त्यांनी जोडली.