Tuesday, June 9, 2026
Homeताजी बातमीकामगार-विरोधी नवे ४ कामगार कायदे तात्काळ रद्द करण्याची मागणी – इंटकचे प्रदेशाध्यक्ष...

कामगार-विरोधी नवे ४ कामगार कायदे तात्काळ रद्द करण्याची मागणी – इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम

राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेस (इंटक) च्या वतीने आज दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी मा. अप्पर तहसीलदार कार्यालय, निगडी पुणे येथे कामगार, कर्मचारी व सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकदिवसीय शांततामय व गांधीवादी आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले.

केंद्र शासनाने कोणतीही पूर्व चर्चा न करता लागू केलेल्या चार नवीन कामगार संहितांच्या निषेधार्थ तसेच कामगारविरोधी धोरणे व कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात विविध कामगार संघटना, कर्मचारी संघटना, आशा, अंगणवाडी, एमडीएम कर्मचारी, एनएचएम कर्मचारी तसेच इतर क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले.

आंदोलनादरम्यान निदर्शने, घोषणाबाजी व सभेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर मा. अप्पर तहसीलदार यांना निवेदन सादर करून कामगारांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात आल्या.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

* चार नवीन कामगार संहिता तात्काळ रद्द कराव्यात

* बियाणे विधेयक व वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावेत

* अणुऊर्जा क्षेत्रातील खाजगीकरणास प्रोत्साहन देणारी धोरणे रद्द करावीत

* मनरेगा योजना बळकट करावी व संबंधित ग्रामीण कायदे मागे घ्यावेत

* रोजगार व विमा क्षेत्रातील १००% थेट परकीय गुंतवणूक निर्णय मागे घ्यावा

* ‘विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक २०२५’ मागे घ्यावे

* सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील रिक्त पदे तात्काळ भरावीत

* अंगणवाडी, आशा, एमडीएम कर्मचाऱ्यांना नियमित करून सरकारी कर्मचारी दर्जा द्यावा

* एनएचएम डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवा द्यावी

यावेळी बोलताना इंटक प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले की, “नवीन कामगार संहितांमुळे कामगारांचे विद्यमान हक्क कमी होत असून कंत्राटीकरण व खासगीकरणाला चालना मिळत आहे. हे धोरण कामगारविरोधी असून त्यामुळे कामगारांच्या रोजगार सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होत आहे. शासनाने कामगार संघटनांशी सखोल चर्चा करूनच निर्णय घ्यावेत. कामगार, कर्मचारी व सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आम्ही लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवू. शासनाने आमच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”

सदर आंदोलन पूर्णपणे शांततेत, शिस्तबद्ध व संविधानिक मार्गाने पार पडले. शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन कामगारांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी अपेक्षा इंटक प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments