अमेरिकेतील जगप्रसिद्ध अशा टाइम मॅगझिनने आपल्या मार्च महिन्याच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीच्या मुखपृष्ठावर शेतकरी आंदोलक महिलांना स्थान दिलं आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासंदर्भातील वृत्तांकनाला मुखपृष्ठावर स्थान देण्यात आलं आहे. या फोटोवर “भारतातील शेतकरी विरोध प्रदर्शनाच्या मार्गावर” अशी ओळ लिहिण्यात आली आहे.
टाइम मॅगझिनच्या पहिल्या पानावर दिल्लीतील टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्या २० महिलांच्या गटाचा फोटो छापण्यात आला आहे. सलवार-कुर्ता अशा पारंपारिक पंजाबी पोशाखामध्ये या महिला घोषणाबाजी करताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनामध्ये या महिलांनीही कशाप्रकारे मागील चार महिन्यांपासून आपला सहभाग नोंदवला आहे यासंदर्भातील वृत्तांकन टाइम्स मॅगझिनने आपल्या विशेष लेखामध्ये केलं आहे. ‘I Cannot Be Intimidated. I Cannot Be Bought,’ म्हणजेच आम्हाला धमकावता येणार नाही आणि विकतही घेता येणार नाही अशा अर्थाच्या मथळ्याखाली हा विशेष लेख छापण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या बहुतांश महिला या पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील ग्रामीण भागातील असल्याचेही टाइमने नमूद केलं आहे.
या लेखामध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक महिलांशी चर्चा करुन त्यांची मतं जाणून घेण्याचाही प्रयत्न करण्यात आळा. “आम्ही परत जावं असं का म्हटलं जात आहे? हे केवळ पुरुषांचे आंदोलन नाहीय. आम्ही सुद्धा शेतकरी आहोत,” असं आंदोलकांपैकी एक असणाऱ्या ७४ वर्षीय जसबीर कौर यांनी टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. ऑक्सफैम इंडियाच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील ८५ टक्के महिला कृषी क्षेत्राशीसंबंधित काम करतात. मात्र देशातील शेतजमीनीच्या मालकीपैकी केवळ १३ टक्के शेतजमीन महिलांच्या नावावर आहे, असेही या मॅगझिनमधून सांगण्यात आले आले आहे.