दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात शनिवारी संध्याकाळी भीषण स्फोट झाला असून, या घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या बाहेर पार्किंगमध्ये उभी असलेल्या एका इको व्हॅनमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात आग लागली असून, अनेक गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
संध्याकाळी सुमारे 6 वाजून 50 मिनिटांनी ही घटना घडली. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, आसपासच्या दुकानांच्या आणि वाहनांच्या काचा फुटल्या. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
अग्निशामक दल, पोलीस, रुग्णवाहिका, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. डॉग स्कॉडच्या मदतीने परिसराची तपासणी सुरू आहे.
स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. हा दहशतवादी हल्ला होता की अपघाती स्फोट, याबाबत तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, आज सकाळी पोलिसांनी फरीदाबादमध्ये मोठी कारवाई केल्यानंतर संध्याकाळी हा स्फोट झाल्याने संशय वाढला आहे.
स्फोटानंतर दिल्लीसह मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. परिसर रिकामा करण्यात आला असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांत राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या घटनेमुळे दिल्लीमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) आणि दहशतवादविरोधी पथक (ATS) देखील चौकशीसाठी सज्ज झाले आहेत.


