दिल्लीमध्ये २५ वर्षीय तरुणाची त्याच्याच शेजारी राहणाऱ्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मंगलपुरी परिसरात ही घटना घडली आहे. पीडित रिंकू शर्मा हा भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता असून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपी नसरुद्दीन, इस्लाम, झाहीद आणि मेहताब यांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार, “रिंकू आणि शेजारी राहणाऱ्या नसरुद्दीन यांच्यात काही धार्मिक वक्तव्यावरुन वाद काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. बुधवारी रात्री नसरुद्दीन आणि इतर तिघे जबरदस्ती घरात घुसले आणि रिंकूच्या पाठीवर चाकूने वार केला”. पोलिसांनी व्यवसायिक वादातून हत्या झाल्याची माहिती दिली असताना विश्व हिंदू परिषद मात्र राम मंदिरासाठी निधी जमा करण्यावरुन हत्या झाल्याचा दावा करत आहे.
हेही वाचाः कोरोनामुळे अरुण गवळीची प्रकृती चिंताजनक; ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू
“आतापर्यंत तपासात मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान रेस्तराँ बंद करण्यावरुन हा वाद झाला होता. सर्वजण एकमेकांना ओळखत होते आणि एकाच परिसरात राहत होते. हत्येमागे इतर कोणतं कारण असल्याचा दावा चुकीचा आहे,” असं पोलिसांनी सांगितलं आहे.