भाऊसाहेब भोईर यांची उपसूचना; सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांचे अनुमोदन
पिंपरी : स्थानिक आणि होतकरू कलाकारांना शिक्षण, प्रशिक्षण व कलाविकासासाठी आवश्यक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ‘हक्काचे नाट्य संकुल’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव काल पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. हा प्रस्ताव नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मांडला असून सभेने त्यास मान्यता दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कला क्षेत्रात कार्य करताना अनेक स्थानिक कलाकारांना योग्य संधी, मार्गदर्शन आणि नाट्यशास्त्रासंबंधी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात सर्व सोयींनी सुसज्ज असे नाट्य संकुल उभारण्याची गरज असल्याचे भोईर यांनी सभेत मांडले.
या नाट्य संकुलामध्ये नाट्यशास्त्राचे शिक्षण, प्रशिक्षण, सांस्कृतिक उपक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा तसेच कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची संकल्पना आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी महानगरपालिकेकडून आर्थिक मदत न घेता समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा प्रकल्प उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ताब्यात असलेली एक जागा या नाट्य संकुलासाठी उपलब्ध करून देण्याची मागणीही या प्रस्तावाद्वारे करण्यात आली. सदर जागेतून हायटेन्शन वीजवाहिनी जात असल्याने तेथे इतर व्यावसायिक बांधकाम शक्य नसल्यामुळे ही जागा नाट्य संकुलासाठी योग्य असल्याचे मत मांडण्यात आले.
या प्रस्तावास सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी अनुमोदन दिले असून महापौर रवि लांडगे यांनी मान्यता दिली आहे. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा आणि स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


