७ एप्रिल २०२१,
राज्यात ठिकठिकाणी कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिमही जोरदार सुरु आहे. पुण्यात लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे. पुण्यातील लसीकरणासाठी आणखी ८६ केंद्र वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण लसीकरण केंद्राची संख्या २०० च्या आसपास वाढणार आहेत.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येत आहे. सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहिले. यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली होती.
सध्या १०९ केंद्रांवर कोरोना लसीकरण
पुणे जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांना लस देण्याचा संकल्प पुणे विभागाने केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ८६ केंद्रांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. या सर्व लसीकरण केंद्रांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुण्यात ८६ केंद्र वाढवली जाणार असल्याने लसीकरणाला वेग मिळणार आहे.
पुण्यात सध्या १०९ केंद्रांवर कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यात आणखी ८६ केंद्रांची भर पडणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे.