पुणे शहरात असलेल्या एकूण मोटार ड्रायव्हिंग स्कूलपैकी निम्म्या स्कूलकडे वाहन चालविण्यास शिकविण्यासाठी आवश्यक गोष्टी नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे पुण्यातील १६२ ड्रायव्हिंग स्कूलची मान्यता रद्द करण्यात आली आहे, तर ३६ ड्रायव्हिंग स्कूलकडे आवश्यक त्या सर्व गोष्टी असल्याने त्यांना ‘ए’ दर्जा देण्यात आला आहे.
परिवहन विभागाने राज्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी करून त्यांना ‘ए प्लस’ ते ‘सी’ दर्जा देण्याच्या सूचना सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना (आरटीओ) दिल्या. त्यानुसार प्रत्येक आरटीओने त्यांच्या विभागातील मोटार ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी मोटार वाहन निरीक्षकांच्या मदतीने केली. त्यानंतर स्कूलमध्ये असलेल्या सुविधांनुसार दर्जा देण्यात आला, तर काही स्कूलमध्ये सुविधा नसल्याचे आढळल्यानंतर त्यांची मान्यता रद्द करण्यात आली. वाहन चालिवण्याचे चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून परिवहन विभागाने हा उपक्रम राबविला होता. शहरात तपासणीपूर्वी साधारण ३६७ मोटार ड्रायव्हिंग स्कूल होत्या. मात्र, काही स्कूल फक्त नावालाच होत्या, तर काही ठिकाणी स्कूलमधील सुविधा नियमानुसार नसल्याचे आढळले.
तपासणीतील समाविष्ट बाबी
मोटार ड्रायव्हिंग स्कूलमधील मूलभूत सुविधा, प्रशिक्षणाचा दर्जा, वाहनांची स्थिती, अत्याधुनिक साधनांची उपलब्धतता अशा गोष्टींची मोटार वाहन निरीक्षकांनी पाहणी केली. त्यानुसार ड्रायव्हिंग स्कूलला १०० पैकी गुण देण्यात आले. ७५ पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या स्कूलना ‘ए’ दर्जा देऊन असुविधा असलेल्या ड्रायव्हिंग स्कूलची मान्यता रद्द केली आहे.