स्वारगेट बस स्टॅंडवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला स्वारगेट पोलिसांनी गुणात गावातूनच अटक केलीय. आरोपीचा दोन दिवस सुरू असलेला शोध अखेर संपलाय. दोन दिवस उसात लपून बसलेला आरोपी जेवायला मिळत नसल्याने पाणी पिण्यासाठी दोन दिवस रात्री त्याच्या नातेवाईकांकडे येऊन गेला आणि पोलिसांनी त्याच मागावर तपास केला. अखेर रात्री एक वाजता हा आरोपी कॅनालमध्ये झोपून असताना शोध घेणाऱ्या पोलिसांना दिसून आल्यावर त्याला तातडीने गाडीत घालून पुण्याला आणण्यात आलंय. अशातच आरोपीला पकडून देणाऱ्या गणेश गव्हाणे यांनी व्हिडीओ शेअर करत नेमकं काय काय झालं? याचा खुलासा केला आहे.
गेले तीन दिवस आरोपी गाडे याचा शोध पोलीस आणि गुणाट ग्रामस्थ घेत होते. रात्री 10 वाजता आरोपीची चाहूल लागली होती. आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. आरोपी ताब्यात घेतला तेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना कॉल केला अन् पोलीस यंत्रणा तात्काळ आली. गावातील सर्वजण पोलिसांना मदत करत होतो. प्रत्येकाला पोलिसांकडून विचारपूस केली जात होती. त्यामुळे प्रत्येक घरात भीतीदायक वातावरण होतं. पोलिसांनी माझ्या भावाला मारलं, त्यामुळे आम्ही त्याच्या रागातून आरोपीला शोधण्याच्या प्रयत्नात होतो. गुणात गावातील जीपीएल क्रिकेट सामने भरवले जातात, तेथील चंदनवस्ती आहे, तिथं आरोपी फिरत होता. आरोपीला मी स्वत: पाहिलं अन् तो पळत असताना मी त्याला पकडलं. त्यानंतर मी माझ्या संपर्कात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मी कळवलं, असं गणेश गव्हाणे याने म्हटलं आहे.
दरम्यान, दत्तात्रय गाडेचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर केला गेला होता, तसंच श्वान पथकाच्या माध्यमातूनही दत्ता गाडेला शोधण्याचा प्रयत्न केला गेला. काल साडेचार तास ही शोध मोहीम सुरू होती, पण या शोध मोहिमेला आता यश आलं आहे. पोलिसांची 100 जणांची तुकडी गुणाट गावामध्ये दाखल झाली होती. हे 100 पोलीस ऊसाच्या शेतात घुसून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेत होते.


