शैक्षणिक क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सर्व १२८ शाळांमध्ये दर शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या खांद्यावरचा भार हलका झाला असून अभ्यासाव्यतिरिक्त नवनवीन गोष्टी शिकण्याचा उत्साह त्यांच्यामध्ये बळावला आहे.
आता प्रत्येक शनिवारी महापालिकेच्या शाळांमधील वर्ग जल्लोषाने गजबजून जातात. शनिवार जो शाळेचा दिवस असतो तो आता गीत, कविता, गायन, प्रश्नमंजुषा, शाब्दिक खेळ, पाककला, चित्रकला, मैदानी खेळ अशा विविध उपक्रमांनी भरलेला आहे. ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा तसेच नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड निर्माण करणारा आहे.
या उपक्रमामुळे महापालिका शाळा कल्पकतेचे केंद्र बनल्या असून गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याच्या कलेत प्रभुत्व मिळवत आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला तसेच पर्यावरणपूरकतेला या दोन्ही गोष्टींना प्रोत्साहन मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिल्यास त्यांची शाळा उपस्थितीची गोडी वाढेल आणि आठवड्याभराच्या शारिरिक, मानसिक त्रासातून मुक्तता मिळेल.
महापालिका शाळांमध्ये या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून काही विद्यार्थी पाककलेचे धडे घेत आहेत. तसेच पाककलेसोबत त्यांना टीमवर्कचे महत्त्वही समजत आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना बागकाम तसेच रोपांची लागवड करणे शिकविले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल मौल्यवान ज्ञान तर प्राप्त होत आहेच पण त्यांच्यामध्ये जबाबदारी आणि संयमाची जाणीवही निर्माण होत आहे.
‘दप्तराविना शाळा’ उपक्रमाने विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासक्रमाबाहेरील त्यांच्या आवडी जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. नृत्य, संगीत, चित्रकला किंवा नाटक यांसारखे कलात्मक उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांची वेगळी बाजू आत्मसात करण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिभेला जोपासण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, दप्तराविना शाळा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची कल्पकता तर वाढलीच आहे पण त्यांच्या कौशल्यालाही वाव मिळाला आहे. पालक आणि शिक्षकांनीही या अग्रेसर विचारसरणीचे कौतुक केले आहे. या उपक्रमाने विद्यार्थ्यांना जड दप्तरांच्या शारीरिक ओझ्यापासून मुक्ती तर दिलीच पण त्यांचा मानसिक भारही हलका केला आहे. जिज्ञासा आणि जीवन कौशल्ये यावर भर देऊन महापालिका शाळा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेशीपलीकडे सतत विकसित होत असलेल्या धावपळीच्या जगात पाऊल ठेवण्यास मदत करत करतील असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी बोलताना व्यक्त केला.