एका दिवसात भारतामध्ये सव्वा लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याचे यावरून दिसून येत आहे. अशातच जगभरातील २२ देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्राझील, फ्रान्स, युक्रेन आणि रशियासारख्या देशांचा समावेश आहे. जगभरामध्ये सोमवारपर्यंत कोरोनाचे १३ कोटी ३० लाखांहून अधिक रुग्ण आढळून आल्याचं आयएएनएसने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. यापैकी २८ लाख ८६ हजार जणांचा मृत्यू झाला. तर १० कोटी ७२ लाख जणांनी कोरोनावर मात केली. जगभरामध्ये दोन कोटी २८ लाख लोकांवर उपचार सुरु आहे. उपचार सुरु असणाऱ्यांपैकी २ कोटी २७ लाख जणांना कोरोनाची कमी अधिक प्रमाणात लक्षणं दिसून येत आहेत तर ९९ हजार ५०० हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
धक्कादायक बाब म्हणजे जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतरही अगदी वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला. २१ फेब्रुवारी रोजी जगामध्ये सर्वात कमी म्हणजे तीन लाख २२ हजार रुग्ण आढळून आले होते. यानंतर मात्र सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. या कालावधीत कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असला तरी सध्या दिवसाला पाच लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण जगभरामध्ये आढळून येत आहेत.
दुसऱ्या लाटेत एका दिवशी अमेरिकेत तब्बल तीन लाख ८० हजार रुग्णही आढळून आलेत. याचप्रमाणे ब्राझीलमध्ये ९७ हजारांहून अधिक रुग्ण दुसऱ्या लाटेत पहायला मिळालं. आता येथे कोरोनाची तिसरी लाट आली आहे. जपानमध्ये १०७ दिवसांनंतर ऑलम्पिक सुरु होणार आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे जपानचे आरोग्य मंत्री नोरीहिसा तामुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटीश व्हेरिएंटमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जपानमध्ये सोमवारी दोन हजार ४५८ नवे रुग्ण आढळून आले तर १० जणांचा मृत्यू झाला. युनायटेड किंग्डम, रशिया, फ्रान्स, इटली आणि जर्मनीसहीत पाच युरोपीयन देशांमध्ये एकूण कोरोना मृत्यूंपैकी ६० टक्के मृत्यूंची नोंद झाली आहे.