देशभरात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांनी निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. देशात ओमिक्रॉनबाधितांची एकूण संख्या ७३ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण वाढत आहेत. आता हा आकडा ३२ वर पोहोचला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीत ओमिक्रॉनबाधितांचा आकडा आणखी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे मुंबईत ३१ डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात बुधवारी ओमिक्रॉनचे चार नवीन रुग्ण सापडले. राज्यात करोनाच्या नवीन विषाणू ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता ३२वर पोहोचली आहे. तर मंगळवारी आठ नवीन ओमिक्रॉनबाधित रुग्ण सापडले होते. त्यातील सात रुग्ण मुंबईतील होते. राज्यात करोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनचे रुग्ण जानेवारीत वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जानेवारीत ‘ओमिक्रॉन’ रुग्णवाढीचा वेग वाढण्याची भीती
राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, करोनाच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूचा संसर्ग जगभरात वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रात जानेवारीत वेगाने फैलाव होण्याची शक्यता आहे. ओमिक्रॉनबाधित रुग्ण ग्रामीण भागासह शहरातही आढळून येतील, असेही त्यांनी सांगितले.राज्यात ओमिक्रॉनचे एकूण ३२ रुग्ण आहेत. त्यापैकी १३ मुंबईत, पिंपरी चिंचवडमध्ये १०, पुणे महापालिका क्षेत्रात २, उस्मानाबादमध्ये २, कल्याण-डोंबिवली, नागपूर, लातूर, वसई-विरार आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. एकूण ३२ रुग्णांपैकी २५ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.