२४ डिसेंबर
तेरा वर्षे सुरु असलेला न्यायालयीन लढा हिंद कामगार संघटनेने जिंकला; कामगारनगरीत आनंदाचे वातावरण
पिंपरी, पुणे (24 डिसेंबर 2019) : महाराष्ट्रातील औद्योगिक व कामगार क्षेत्राच्या इतिहासात ‘14 डिसेंबर 2019’ हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित डाई-ईची करकरीया लि. कंपनी आणि हिंद कामगार संघटना यांच्यामध्ये गेली 13 वर्ष सुरु असणारा न्यायालयीन लढा कामगारांनी जिंकला आहे. कंपनीकडून कामगारांना देण्यात येणारे सर्व आर्थिक लाभ या दिवशी न्यायालयात जमा करण्यात आले. हा लढा सर्व कामगार संघटनांना मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे, असे हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.
सोमवारी, (दि. 23) पुणे मुंबई महामार्गावरील कासारवाडी येथे डाई-ईची करकरीया लि. कंपनीच्या प्रवेशव्दारासमोर हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते कामगारांना डिमांड ड्राफ्टचे वितरण करण्यात आले. यावेळी इंटक पुणे जिल्हा सरचिटणीस मनोहर गडेकर, युनिट अध्यक्ष संजय काशीद, आनंदराव फडतरे, विनायक पोतदार, छबू जवळकर, सुर्यकांत ससाणे, सदानंद जोशी, केशव जाधव तसेच सर्व कामगार व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. कैलास कदम म्हणाले की, शनिवार, दि.14 डिसेंबर 2019 रोजी पुण्यातील औद्योगिक व कामगार न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये डाई-ईची करकरीया लि. कंपनी आणि हिंद कामगार संघटना यांच्यामध्ये मागील 13 वर्षांपासून सुरु असलेला न्यायालयीन लढा सामंजस्याने सर्वानुमते मिटविण्यात आला. कंपनीने कामगारांना देण्यात येणारे सर्व आर्थिक लाभ डिमांड ड्राफ्ट स्वरूपात न्यायालयात जमा केले. याचा लाभ 2008 सालानंतर निवृत्त झालेल्या सर्व कर्मचा-यांसह न्यायालयात गेलेल्या एकूण 170 कामगारांना व या कालावधीत मृत पावलेल्या कामगारांच्या वारसांना मिळाला आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक व कामगार क्षेत्रात एखाद्या कामगार संघटनेने सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयीन लढा लढून यश मिळविणे ही पहिलीच घटना आहे. या लढ्याचे नेतृत्व हिंद कामगार संघटनेच्या माध्यमातून मला करण्याची संधी कामगारांनी दिली. हा लढा सर्वोच्च न्यायालयाच्या सामंजस्याने मिटविण्यास संघटनेला यश आले. या प्रतिकूल काळात सर्व कामगारांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. ते डिमांड ड्राफ्ट आज घेताना कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या चेह-यावरचा आनंद पुढील काळात कामगारांसाठी लढण्यासाठी मला प्रेरणादायी ठरले, असे ही डॉ. कैलास कदम म्हणाले.
शनिवार, दि.14 डिसेंबर 2019 रोजी पुण्यातील औद्योगिक व कामगार न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये डाई-ईची करकरीया लि. कंपनी आणि हिंद कामगार संघटना यांच्यामध्ये मागील 13 वर्षांपासून सुरु असलेला न्यायालयीन लढा सामंजस्याने सर्वानुमते मिटविण्यात आला. यावेळी मेहरबान न्यायाधीश एस.आर. तांबोळी, मु. रा. कुंभार, श्रीमती के. एन. फटांगडे, श्रीमती एम.एम. मुळीक, श्रीमती धनश्री मोरे, किरण देशपांडे, वकिल पॅनलमध्ये अॅड. सविता साबणे, ॲड. मनोज सुर्यवंशी, ॲड. राजवर्धन कुलकर्णी तसेच हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, सरचिटणीस यशवंत सुपेकर, खजिनदार सचिन कदम, उपाध्यक्ष शांताराम कदम. कंपनी व्यवस्थापनाचे सेक्रेटरी कविता थाडेश्वर, जनरल मॅनेजर डॉ. संजय पुरव, मनुष्यबळ विकास अधिकारी प्रदीप पाठक. संघटनेचे वकील ॲड. गौरव पोळ, अतुल दीक्षित. कंपन वकील ॲड. आर. वाय. जोशी, ॲड. आदित्य जोशी आदी उपस्थित होते.