१२ डिसेंबर २०२०,
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. भाजपचे नेते शिवाय इतर पक्षातील नेत्यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुंडे यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्विट करत गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे. धनंजय मुंडे यांचं हे भावनिक ट्विट चर्चेचा विषय ठरलं आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन केलं जात. यंदा मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम होणार नसल्याचं, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यामुळं सोशल मीडियाच्या माध्यमातूनच गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांनीही एक ट्विट करत जुन्या आठवणी जागवल्या आहेत.
‘आप्पा… खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम असते. त्यात प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व. अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,’ असं ट्विट मुंडे यांनी केलं आहे.