शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची रस्त्यांवरील वाढती संख्या आणि प्रदूषणात तसेच तापमानात होणारी वाढ लक्षात घेता यासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने दर गुरूवारी सायकलवरून कामावर अर्थात ‘’सायकल टू वर्क थर्सडे’’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सहभाग वाढीनंतर रस्त्यांवरील रहदारी कमी होण्यास तर मदत मिळेलच पण त्यासोबत दर गुरूवारी आरोग्यदायी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. यामध्ये नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्वाचा असून लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून या उपक्रमाला आणखी व्यापक रुप देण्यास मदत मिळू शकते, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी ‘’सायकल टू वर्क थर्सडे’’ या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या उपक्रमामध्ये स्वत: आयुक्त शेखर सिंह यांनी भाग घेत निवासस्थानापासून ते कार्यालयापर्यंत सायकलवर प्रवास केला. तसेच इतर अधिकारी, कर्मचारीही आज कार्यालयात सायकलवर उपस्थित झाले. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उपअभियंता सुनिल पवार, कनिष्ठ अभियंता सुनिल बेळगावकर, संतोष कुदळे, कॉम्प्युटर ऑपरेटर अनंत चुटके तसेच पिंपरी चिंचवडचे बायसिकल मेयर आशिक जैन तसेच कर्मचारी यांचा समावेश होता.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहरातील प्रदूषण, रस्त्यांवरील वाहनांची वाढती संख्या, वाढते शहरी तापमान या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग तितकाच महत्वाचा असून प्रत्येकाने वैयक्तिक पुढाकार घेऊन या उपक्रमांमध्ये हातभार लावणे गरजेचे आहे. दर गुरूवारी ‘’सायकल टू वर्क थर्सडे’’ या उपक्रमात महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे नागरिकही सायकलचा वापर करून निरोगी आणि पर्यावरणपुरक भविष्याच्या दिशेने वाटचाल करू शकतात आणि तरूण पिढीलाही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात, असेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.