Thursday, February 6, 2025
Homeताजी बातमीआंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देणार –...

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध विभागात पुरस्कार मिळत आहेत. या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सहयाद्री अतिथीगृह येथे चित्रपट उद्योगातील चित्रपट / टिव्ही / ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माते, तंत्रज्ञ यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, कोल्हापूर चित्रनगरीचे संजय पाटील, दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक, लेखक आणि दिग्दर्शक संतोष आयाचित, निर्माते सुनील भोसले, निर्माते संदीप घुगे,अभिनेत्री सुषमा शिरोमणी, शामाशिष भट्टाचार्य, शेमारू कंपनीचे केतन मारू, चैतन्य चिंचलीकर यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यामागे महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विजेते चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचावे आणि या चित्रपट निर्मात्यांनी अधिक चांगल्या सिनेमाची निर्मिती भविष्यात करावी हा उद्देश आहे. मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा मिळावी, प्राईम स्लॉट मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक घेण्यात येईल.

गेल्या अनेक वर्षांपासून गोरेगावच्या चित्रनगरीत अनेक मराठी मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. या मालिका निर्मात्यांना पहिल्या वर्षी चित्रीकरण भाड्यात ५० टक्के तर दुसऱ्या वर्षी २५ टक्के सूट देण्यात येते. यापुढे मालिका पहिल्या वर्षानंतर चालू राहिल्यास त्यांना चित्रीकरण भाड्यात २५ टक्के सूट देण्यात येईल. चित्रनगरीत चित्रीकरण करण्यासाठी दर आकारण्यात येतात, हे दर किती असावे, ते कधी नेमके वाढविण्यात यावे याबाबत धोरण ठरविण्यात येणार असल्याने श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

चित्रनगरीमध्ये एक खिडकी योजना सुरू असून यामध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली जाते. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे पर्यटन क्षेत्रात चित्रीकरण करावयाचे असल्यास पूर्वी 54 हजार प्रती दिवस शुल्क होते. मात्र यापुढे मराठीसाठी ३० हजार रुपये आणि अन्य भाषेसाठी ३५ हजार रुपये प्रती दिवसाचे चित्रीकरण शुल्क असेल असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले,

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा परिसर ५२१ एकरने व्यापलेला आहे. चित्रनगरी परिसरात एकूण १५ कलागारे असून ७० बाह्य चित्रीकरण स्थळे आहेत. आजपर्यंत चित्रनगरीत अनेक मराठी, हिंदी अन्य भाषांच्या चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात येत असून आजही अनेक चित्रपट, मालिका तसेच प्रसिद्ध कथाबाह्य कार्यक्रमांचे चित्रीकरण होत आहेत. येणाऱ्या काळात या चित्रनगरीचे अत्याधुनिकीकरण करण्याबाबत आराखडा करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात ६५ जागांचे नूतनीकरण यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील नाट्यगृहांचे अत्याधुनिकीकरण याबाबतही नियोजन करण्यात येत आहे.बैठकीत श्री महेश कोठारे, प्रसाद ओक, सुषमा शिरोमणी आदींनी सूचना मांडल्या; त्या सूचनांची दखल श्री. मुनगंटीवार यांनी घेतली व तशा सूचना विभागाला दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments