Tuesday, March 18, 2025
Homeताजी बातमीचित्रपट निर्मिती क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

चित्रपट निर्मिती क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

  • मकरंद माने दिग्दर्शित ‘पोरगा मजेतंय’ चित्रपटाला यावर्षीचा संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार
  • ‘शुड द विंड ड्रॉप’ (दिग्दर्शक – नोरा मार्टिरोस्यान) या चित्रपटाने पटकावला ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’

चित्रपटांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत चित्रपट निर्मिती क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, याबाबतची अधिकृत घोषणा राज्याच्या सांस्कृतिक विभागातर्फे लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा आज प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे पार पडला, त्यावेळी देशमुख बोलत होते. यावेळी २०२२ मध्ये पार पडणा-या २० व्या पिफच्या तारखा देखील देशमुख यांनी जाहीर केल्या. २० वा पिफ हा ३ ते १० मार्च २०२२ दरम्यान पार पडेल.

महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, कलात्मक संचालक समर नखाते, पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, डॉ. मोहन आगाशे, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उल्हास पवार आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये बोलताना अमित देशमुख म्हणाले, “चित्रपट निर्मितीला उद्योगाचा दर्जा मिळाल्यास चित्रपट निर्मिती प्रक्रिया अधिक सुलभ होईल व नव्या संधी निर्माण होतील. मुंबई ही चित्रपट निर्मिती क्षेत्राची राजधानी आहे. परंतु या पुढे राज्यातील पुण्यासारख्या इतर शहरांमध्ये देखील चित्रपट निर्मितीशी संबंधित पायाभूत सोयीसुविधा विकसित व्हाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करेल. या सर्व प्रक्रियेत डॉ जब्बार पटेल यांसह पिफच्या तज्ज्ञ समितीने सल्लागार म्हणून भूमिका निभावावी.”

जागतिक स्पर्धा विभागात ‘शुड द विंड ड्रॉप’ (दिग्दर्शक – नोरा मार्टिरोस्यान) ही फ्रांस, अर्मेनिया, बेल्जियम देशातील निर्मात्यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटाने यावर्षी प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकाविला. रोख रूपये दहा लाख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. चित्रपटाच्या पुरस्काराची रक्कम निर्माते आणि दिग्दर्शक यांमध्ये विभागण्यात येईल.

भारतीय दिग्दर्शक गौरव मदान याला त्याच्या ‘बारा बाय बारा’ या चित्रपटासाठी प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक पुरस्काराने गौरविण्यात आले. रोख रूपये पाच लाख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

जागतिक चित्रपट स्पर्धेत रोमानियाच्या दिग्दर्शक रादू जुडे याला ‘अप्परकेस प्रिंट’ या चित्रपटासाठी ‘स्पेशल मेंशन टू द डिरेक्टर’ पुरस्कार मिळाला तर शर्लटन (दिग्दर्शक – अॅग्नीएश्का हॉलंड, चेक/ पोलंड) या चित्रपटाला परिक्षक विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

यानंतर मराठी चित्रपट स्पर्धा विभागात मकरंद माने दिग्दर्शित ‘पोरगा मजेतंय’ या चित्रपटाने ‘संत तुकाराम सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोख रूपये पाच लाख, मानचिन्ह व मानपत्र देऊन चित्रपटाच्या चमूला गौरविण्यात आले. चित्रपटाच्या पुरस्काराची रक्कम निर्माते आणि दिग्दर्शक यांमध्ये विभागण्यात येईल.

याबरोबरच दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार – विवेक दुबे (चित्रपट -फन’रल)
सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार – शशांक शेंडे (चित्रपट – पोरगा मजेतंय)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार – नेहा पेंडसे (चित्रपट- जून)
सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक पुरस्कार – रमेश दिघे (चित्रपट -फन’रल)
सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी पुरस्कार – सुरेश देशमाने (काळोखाच्या पारंब्या)

प्रत्येकी रोख रुपये २५ हजार, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. याबरोबरच दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांना ‘गोदाकाठ’ या चित्रपटासाठी व विशाल कुदळे यांना ‘टक- टक’ या चित्रपटासाठी ज्युरी स्पेशल प्रमाणपत्र देत गौरविण्यात आले.

याशिवाय एमआयटी एसएफटीच्या वतीने देण्यात येणारे ‘ह्युमन स्पिरीट अवॉर्ड’ यावर्षी ‘ट्रू मदर्स’ (दिग्दर्शक – नाओमी कवासे, जपान) या चित्रपटाला देण्यात आला. १००० अमेरिकी डॉलर असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पार पडणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे १९ वे वर्ष होते. ज्यामध्ये ५७ देशांमधून १५७ चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांनी घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments