Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीनिखळलेल्या घुंगरांचा आवाज कोणाच्या कानी पडेल का..? थापाडे..साले ?

निखळलेल्या घुंगरांचा आवाज कोणाच्या कानी पडेल का..? थापाडे..साले ?

२६ जानेवारी २०२०,

( संकलन – पत्रकार सुभाष सुतार आणी अविनाश कांबीकर )

राष्ट्रपतींच्या हस्ते “राष्ट्रपती” पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचे स्मारक अजूनही “कणातीत”अशी बातमी वाचण्यात आली. लातूरचे जेष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे सरांनी हे वृत्त लिहिले आहे.

बातमी मागे एक बातमी असते. अगदी तेच प्रकर्षाने लक्षात आले, म्हणूनच वाईट वाटले. कारण अठरा वर्षे उलटून ही, विठाबाई यांच्या स्मारकासाठी एका ही सरकारला वेळ मिळाला नाही. हे विठाबाई यांचे दुर्दैव नाही किंवा त्यांचा अपमान ही नाही. खरे म्हणजे, हा कलासक्त प्रेक्षक – रसिक मायबाप यांचा अपमान आणि दुर्दैव आहे.

राजकारणी मोठे चमत्कारिक असतात. घोषणा करण्यात तरबेज असतात. एखादे घोषणेचे स्वागत होते. त्याचा पाठपुरावा झाला तर ठिक, नाहीतर राजकारण्यांना काही घेणे देणे नसते. अपवाद वगळता, त्यांना नवनवे मुखवटे घालून मिरवायची सवय लागलेली असते. दिलेली आश्वासने पूर्ण करता येतील की नाही, याची शाश्वती नसते, त्यामुळे गाजर दाखवायची संधी ते सोडत नाहीत. जनतेलाही हे सवयीचे झाले आहे.

लोकशाही म्हणून मतदान करायचा शिरस्ता आहे. तो आपण पाळतो, बाकी सगळे आलबेल आहे. फुले-शाहू- आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी राजे यांच्या नावाचा जयघोष करून, शेतकर्‍यांच्या नावाने सरकार चालवायचे, मात्र खुर्ची मिळाली की, वागायचे वेगळे. हे काही नवीन नाही. शेतकरी उपाशीपोटी आत्महत्या करतोय. हे सरकारला चांगले माहित आहे.तरीही शेतकरी बापासाठी शाश्वत धोरण उभे करायला वेळच नाही. काय म्हणावे या गोष्टीला.

छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे भिजत घोंगडे आहे. ज्या वास्तू जपायला हव्यात, त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. स्मारकासाठी सरकारला कधी वेळ मिळेल आणि “तो” दिवस कधी उजाडतो ? असा प्रश्न पडतो. स्मारकासाठी पैसे नाहीत, असे गृहीत धरून चाले पर्यंत, राजकारणी लोकांच्या संपत्तीचा हिशोब, स्मारकासाठी येणाऱ्या खर्चाच्या हजारो पट अधिक अधिक झालेला असणार, हे कटू सत्य आहे.

अठरा वर्षे झाली, ज्या सम्राज्ञीच्या घुंगराने महाराष्ट्राला वेड लावले, तिचेच स्मारक लाल फाईलीत अडकून पडले आहे. सरकारला वेळ नाही. अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले. सांस्कृतिक मंत्री म्हणून कोणी जबाबदारी पार पाडली नाही. गेल्या पाच वर्षांत ही चाल ढकल झाली. त्यात सांस्कृतिक मंत्री म्हणून विनोद तावडे यांच्याकडे पदभार होता. या मंत्राल्या या पेक्षा जास्त रस मुख्यमंत्री पदावर होता. त्यामुळे त्यांना विठाबाई यांच्या स्मारक फाईलकडे पहायला वेळ मिळाला नसणार, या माणसाने शिक्षण विभागाची वाट लावली. नुसत पारदर्शक सरकार काय चाटायचं..का ? काम होत नसतील तर, काय उपयोग अशा सरकार आणि या राजकारणी लोकांचा.

महाराष्ट्रातील रसिकांनी लोककलेला नेहमी डोक्यावर घेतले आहे. अशी हजारो दर्दी माणस येथे आहेत. यांनी ठरवले तर, अशा शोषित समाजाचे नेतृत्व करून, निर्माण झालेल्या समस्या चुटकीसरशी सुटतील. आपण म्हणतो ना, थेंबे तळे साचे, विठाबाई नारायणगावकर यांच्या चाहत्यांनी “एक हाक” दिली ना, हजारो आवाज “ओ” म्हणून निघतील, हा विश्वास आहे. विठाबाई गेवराई शहरात आल्या होत्या, त्यांचा शांतीसदन येथे साडी चोळी देऊन र्‍हदय सत्कार केला होता, अशी आठवण आहे.

विठाबाईचां तमाशा म्हणजे केवळ करमणुकीचे साधन नव्हते तर ती कला त्या थाटात करायच्या आणि सामाजिक बांधिलकी जपायची ही त्यांनी मनाशी खुणगाठ बांधली होती .

भारत-चीन युद्धाच्या दरम्यान विठाबाईंनी लष्करातील सैनिकांसाठी त्यांनी नेफा सीमेवर १९६२ तमाशा सादर केला होता. घरापासून दूर देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांना तमाशा कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्याचा बहूमान विठाबाईंनी मिळाला.

विठाबाई १९६८ साली पुणे येथे भरलेल्या अखिल भारतीय तमाशा परिशदेच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी १९९० रोजी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कारही दिला. दलित नाट्यासंमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार, जागतिक महिला दिन पुरस्कार, माननीय शदर पवार, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, खासदार फुलनदेवी, खासदार रामदास आठवले, खासदार शबाना आझमी यांच्या हस्तेही विठाबाईंचा गुणगौरव करण्यात आला. भारत सरकारचा सन्मानाचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.१९९० मध्ये त्यांना कलेतील राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. योगदानाबद्दल पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानचा दया पवारांच्या नावे या बहुआयामी विठाबाईचा गौरव करून सन्मानही करण्यात आला होता.

नव्या तंत्रज्ञानाच्या बाजारू जगतात तमाशा अर्थात “लोकनाट्य” आणि त्याचा मुळ बाज हरवला आहे. रंगसंगती आल्याने तमाशाला घरघर लागली आहे. मनोरंजन, शिक्षण आणि समाज प्रबोधन करून, तमाशाने आपली जबाबदारी पार पाडली आहे. खर म्हणजे, सरकारी धोरण एका प्रकारची मरणासन्न अवस्था राहीलेली आहे. सरकारने लोककलेला आश्रय दिला पाहिजे. त्यांची ती जबाबदारी आहे. परंतू , सरकारी अनास्थेमुळे लोककलेचे व्यासपीठ काळोखात चाचपडत आहे. अजूनही काहीजण टिकून आहेत. काही बुडाले. बर, हे लोककलेच खुळ म्हणजे, निखारा हाती घेऊन चालणे आहे. अनेकांनी यात उभ आयुष्य खर्ची घातले. कलेची ओढ, एका अर्थाने हे वेड जाता जात नाही.

तमाशा सम्राट पठ्ठे बापुराव यांच्या पासून सुरू झालेली लोकनाट्य परंपरा बहरत गेली, रसिकांनी ही दाद दिली. आजच्या घडीला जवळपास पाचशे लोकनाट्य तमाशा मंडळ असतील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही लोककला जोपासली आहे. कधी काळी गाडी घोडी घेऊन रसिक, ज्या ठिकाणी तमाशा असेल तिथे जाऊन हजेरी लावून दाद देत असत. भाऊ बापू नारायणगावकर, तात्या सावळजकर, शिवा संभा सौलापूरकर,चांदभाई, भिकाभाई, दगडू तांबे, अशी खुप मोठी माणसे या व्यासपीठावर आली आणि गेली. त्यांचा वारसा पुढे सुरू आहे. अलीकडच्या काळात मंगला बनसोडे, काळू – बाळू ( खाडे ) दत्तोबा तांबे, ढवळापुरीकर यांनी फड गाजवले आहेत. तमाशा आणि त्यातला अस्सल बाज, भाऊ बापू आणि दादू इंदूरीकरांनी सांभाळून ठेवला. त्यामुळेच हे दोघेही राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले होते. अलीकडच्या काळात या कलेला अवकळा आली आहे. लोककला नव्या युगात हरवत चालल्या आहेत. कलर मोबाईल, रंगीत टीव्ही आणि सोशल नेटवर्किंग च्या लहान मोठ्या माध्यमांनी नवे आव्हान उभे केले. त्याचा परिणाम झाला आहे.

वासूदेव, गोंधळी, नंदीबैल, आता कुठे दिसत नाही. खर म्हणजे, ही लोककला टिकली पाहिजे. परंतू , कालौघात मर्यादा आल्या आणि या कलेला जीवनमान बदलाचा फटका बसला. आर्थिक परिस्थिती बदलली. त्याचा हा परिणाम आहे. महागाई भरमसाठ वाढली आहे. देणारे हात कमी होत गेल्याने, कलावंतांनी स्वतःला थांबवले. खर्च परवडत नाही, दुसरा मार्ग नाही. सरकारी धोरण लोककलेला पोषक नाही. मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख डाॅ. चंदनशिवे म्हणायचे,आईच्या दुधाची चव आणि डोळ्यातल्या आसवांचा खारटपणा, जोवर टिकून आहे. तोवर लोककलेला मरण नाही. रसिकांनी ही लोककला जपावी, लोककलेला सांभाळून घ्यावे. सरकारने सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी, एवढीच माफक अपेक्षा कलावंताना असते.

अठरा वर्षे उलटून ही, विठाबाईंच्या स्मारकासाठी एका ही सरकारला वेळ मिळाला नाही. थापाडे साले..? हे विठाबाई यांचे दुर्दैव नाही किंवा त्यांचा अपमान ही नाही. खरे म्हणजे, हा सगळ्या कलासक्त प्रेक्षक – रसिकांचा अपमान आणि दुर्दैव आहे ?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments