नोएडात एका १५ वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवरून या मुलाने उडी घेतली. गुरूवारी रात्री ही घटना घडली. मयत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी केली. त्यानंतर ही घटना समोर आली.
“मोबाईलवर गेम खेळण्यावरून आईवडिलांनी रागावले. त्यामुळे मुलगा नाराज झाला होता. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तो घरातून निघून गेला. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह जवळच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ आढळून आला. त्याने गुरुवारी रात्रीच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली,” अशी माहिती गुन्हेशाखा अतिरिक्त पोलीस उपायुक्त एलमारन यांनी दिली.
सेक्टर ११० मधील त्याच्या घरातून तो अचानक बेपत्ता झाला होता. मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची फॉरेन्सिक तज्ज्ञांकडूनही तपासणी केली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.